ठाणे : सरपंचपदाच्या उमेदवारासाठी सर्वांच्या नजरा श्रमजीवीकडे | पुढारी

ठाणे : सरपंचपदाच्या उमेदवारासाठी सर्वांच्या नजरा श्रमजीवीकडे

भिवंडी; संजय भोईर :  ठाणे जिल्ह्यातील भिवंडी सह शहापूर मुरबाड अशा तीन तालुक्यातील एकूण 106 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक
निवडणूका होत आहेत. त्यापैकी शहापूरमधील सर्व 70 व भिवंडी तालुक्यातील 31 पैकी 28 अशा 98 ग्रामपंचायती या अनुसूचित आदिवासी विकास क्षेत्रातील अर्थातच पेसा परिसरातील असल्याने येथील सरपंच पद हे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. त्यात सर्वात जास्त उमेदवार श्रमजीवीकडे आहे. त्यामुळे सर्वच पक्षांकडून सरपंच पदाच्या उमेदवारासाठी श्रमजीवी संघटनकडे नजरा लावून ठेवल्या आहेत.

भिवंडीसह शहापूर तालुक्यात श्रमजीवी संघटनेची संघटनात्मक बांधणी मोठ्या प्रमाणावर असल्याने येथील ग्रामपंचायतींमध्ये संघटना कोणासोबत घरोबा करते, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सर्वच राजकीय पक्षांकडे ओबीसी सर्वसाधारण गटातील उमेदवार
असले तरी सरपंच व मोठ्या प्रमाणावर राखीव सदस्य असलेल्या अनुसूचित जमाती गटातील उमेदवारांची वानवा असल्याने श्रमजीवी संघटनेकडील कार्यकर्ता सोबत घेतल्यास हक्काची  सभासद असलेले मतदार आपल्या सोबत येण्याचा कयास सर्वांनी बांधला आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी नंतर भाजप-शिवसेना व एकनाथ शिंदे गट या तिघांकडून श्रमजीवी संघटने सोबत स्थानिक पातळीवर चर्चा केली जात आहे. परंतु त्या बाबत सर्व माहिती घेऊन अंतिम निर्णय संस्थापक विवेक पंडित घेणार आहेत. पक्ष फुटीचा व्हायरस
श्रमजीवी संघटनेत शिरू नये, यासाठी पदाधिकारी यांना निवडणुकीच्या रिंगणात  न उतरवता संघटनेच्या उमेदवारांवर बारीक लक्ष ठेवून संघटनेच्या ऐक्याला धोका पोहचणार नाही याची काळजी पदाधिकारी घेणार असल्याचे शेवटी श्रमजीवीचे सरचिटणीस बाळाराम भोईर
यांनी स्पष्ट केले आहे .

श्रमजीवीचे 288 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

या पार्श्वभूमीवर श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस बाळाराम भोईर यांच्याशी संपर्क साधला असता भिवंडी तालुक्यातील 17 व शहापूर तालुक्यातील 31 अशा 48 ठिकाणी सरपंच पदाचे उमेदवार तर भिवंडी मध्ये 137, शहापूर 144 व मुरबाड मध्ये 7 असे एकूण 288 सदस्य पदासाठी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात  उतरविले असल्याचे सांगितले

Back to top button