

नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरासह केडगाव, सावेडी, मुकुंदनगर, बोल्हेगाव सारख्या उपनगरामध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. संबंधित विभागाने मोकाट कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा अन्यथा अधिकार्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिला. शहरातील मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त होण्याच्या दृष्टीने महापौर रोहिणीताई शेंडगे व आमदार संग्राम जगताप यांनी आज दुपारी महापालिकेत अधिकार्यांची बैठक घेतली. या बैठकीला आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, सचिन शिंदे, प्रशांत गायकवाड, विनीत पाऊलबुधे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, उपायुक्त यशवंत डांगे, मुख्यलेखाअधिकारी मोरे, आरोग्याधिकारी डॉ. अनिल बोरगे, कोंडवाडा विभागप्रमुख हंस, घनकचरा व्यवस्थापन प्रमुख डॉ. शंकर शेडाळे, सहा. नगररचनाकार आर. जी. सातपुते, एजन्सीचे पुनीता खन्ना उपस्थित होते.
महापौर रोहिणीताई शेंडगे म्हणाल्या, भटके कुत्र्यांच्या झुंडीने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित विभागाने नागरिकांच्या तक्रारीची वाट न पाहता मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. कुत्रे पकडण्यासाठी वाहनांची संख्या वाढवी. नवरात्रोत्सवात महिला मोठ्या प्रमाणात मंदिरामध्ये पायी जातात. त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा ठिकाणी असलेल्या मोकाट कुत्र्याचा बंदोबस्त करण्यात यावा.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले, कुत्रे पकडणार्या एजन्सीने डॉग व्हॅन व कर्मचारी संख्या कमी आहे. प्रत्येक झोनला एक वाहन देऊन त्या-त्या परिसरातील मोकाट कुत्रे पकडण्याची मोहीम राबवावी. नवरात्रोत्सव, दसरा, दिवाळी या सणामध्ये नागरिकांना त्रास होणार नाही यादृष्टीने खबरदारी घ्यावी.
चर्चा नको कामे करा : आमदार जगताप
आमदार सग्राम जगताप म्हणाले, महापालिका प्रशासनाने भटके कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ज्या भागामध्ये जास्त भटके कुत्रे वावरतात अशा ठिकाणच्या कुत्र्यांचा तातडीने बंदोस्त करण्यात यावा. यापूर्वी महापालिकेला बजावले, आता प्रशासनाने गांभीर्याने घेऊन तातडीने उपाय योजना कराव्यात अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. प्रशासनाने शहर व उपनगरामध्ये कर्मचारी नियुक्ती करून मोकाट कुत्र्यांचे ठिकाणे शोेधून त्यांचा बंदोबस्त करावा.