नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी (Congress president election) शशी थरुर आणि मल्लिकार्जुन खर्गे, केएन त्रिपाठी रिंगणात आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी या नेत्यांचे अर्ज दाखल झाले. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आणि त्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना आपला पाठिंबा जाहीर केला. यामुळे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिहेरी लढत पहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे काँग्रेसमधील G23 गटातील नेत्यांनी खर्गे यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या निवडणुकीत खर्गे यांचे पारडे जड मानले जात आहे.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसच्या एकूण ३० नेत्यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नावाचा प्रस्ताव पुढे केला. मी मोठ्या बदलासाठी लढत असल्याची प्रतिक्रिया खर्गे यांनी दिली आहे. सर्व नेते, कार्यकर्ते, प्रतिनिधी आणि मंत्री यांनी मला पाठिंबा देऊन प्रोत्साहन दिले. मी त्यांचे आभार मानतो. १७ ऑक्टोबरला निकाल काय लागतो ते पाहू. पण मी जिंकेन अशी आशा आहे, असा दावा खर्गे यांनी केला आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी मला आश्वासन दिले की पक्षाकडे अधिकृत उमेदवार नाही. गांधी कुटुंबीय या निवडणुकीत तटस्थ राहतील आणि जर अधिक उमेदवार उभे राहिले तरी त्यांचे स्वागत असेल. त्या भावनेने मी माझी उमेदवारी दाखल केली. कोणाचाही अनादर करायचा नाही. ही एक मैत्रीपूर्ण लढत असल्याचे शशी थरुर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या G-23 गटातील भूपिंदर सिंह हुडा, आनंद शर्मा, मनिष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांनी खर्गे यांच्या उमेदवारी अर्जावर प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक (Congress president election) जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा नवीन अध्यक्ष कोण होणार यावर अनेक चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. शशी थरूर यांनी आपण निवडणूक लढण्यास उत्सूक आहोत हे अगदी सुरुवातीपासूनच स्पष्ट केले होते. त्यानंतर अशोक गेहलोत यांचेही नाव चर्चेत होते. मात्र काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबतच्या झालेल्या बैठकीनंतर अशोक गेहलोत यांनी आपण निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, अशोक गेहलोत यांनी मल्लिकार्जुन खर्गे यांना पाठिंबा दिला आहे.
काँग्रेसच्या अधिसूचनेनुसार, निवडणूक अर्ज भरण्याची प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत आहे. बिनविरोध निवडणूक न झाल्यास १७ ऑक्टोबरला मतदान आणि १९ ऑक्टोबरला मतमोजणी होईल. त्याच दिवशी निवडणुकीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
राजस्थानातील बंडखोर युवा नेते सचिन पायलट यांनी गुरुवारी रात्री काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे तासभर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी आपण राजस्थानमध्येच पक्षासाठी काम करणार असल्याचे स्पष्ट केले. या घडामोडींमुळे लवकरच पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रिपद सोपवले जाण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केली जात आहे. पायलट यांनी मात्र या विषयावर थेट बोलणे टाळले आहे.
काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडलेले ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांची राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाची खुर्चीदेखील संकटात आली आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी गुरुवारी तसे स्पष्ट संकेतच दिले.
हे ही वाचा :