ठाणे : महाराष्ट्र सुरक्षा बलला वाली कोण? | पुढारी

ठाणे : महाराष्ट्र सुरक्षा बलला वाली कोण?

ठाणे; पुढारी डेस्क :  लोहमार्ग, शहर पोलीस आयुक्तांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावणार्‍या महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान यांना वाली कोण? असा प्रश्न गुरुवारी पुन्हा एकदा जवानांकडून चर्चिला गेला. या निमित्त ठरले एका सहकार्याचा अचानक मृत्यू तर दुसर्‍याचा
ऑनड्युटी डोळा निकामी झाल्याचे!

कुठल्याच प्रकारे विमा सुरक्षा कवच नसल्याने, मेडिक्लेम, भत्ते नसल्याने डोळा निकामी झालेल्या जवानाला उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च असल्याने त्या जवानाला उपचारासाठी खंडाळाहून थेट मुंबई गाठावी लागली आहे.

मूळचे कोल्हापुरातील आजरा गावचे सुपुत्र असलेले रामदास मस्कर हे रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने घरी होते. रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. कुटुंबियांनी त्यांना त्वरित नायर रुग्णालयात दाखल केले. तेव्हापासून ते व्हेंटीलेटरवर होते. उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास रामदास मस्कर यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बुधवारी सुरक्षारक्षक किरण साळुंखे हे मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर कर्तव्यावर होते. त्यावेळी सुसाट जाणार्‍या गाडीमुळे उडालेला दगड किरण यांच्या डोळ्यावर लागला. दगडाच्या जबरदस्त फटका बसल्याने त्यांचा डोळा निकामी झाला आहे. तेथील स्थानिक रुग्णालयात डोळ्याच्या उपचारासाठी लाखो रुपये खर्च असल्याने ते मुंबईतील जे जे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. या दोन्ही घटनांमुळे मस्कर व साळुंखे कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

कुठलीच सुविधा नसल्याने या दोन्ही जवानांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस किती आर्थिक मदत करणार? इतर पोलीस विभागांप्रमाणे महाराष्ट्र सुरक्षा बलला भत्ते, सुविधा मिळणार का? अशी चर्चा इतर जवानांमध्ये दिवस रंगली होती, अशी माहिती दै. पुढारीला नाव न सांगण्याच्या अटीवर अनेक जवानांनी सांगितले.

कोविडमुळे 7 जणांनी गमावले प्राण

मुंबईवर झालेल्या 26 /11 च्या हल्ल्यानंतर महाराष्ट ? सुरक्षा बलची स्थापना करण्यात आली. 2010 साली या विशेष सुरक्षा महामंडळाची स्थापना करण्यात आली असून 10 हजारांहून अधिक जवान कर्तव्य बजावत आहेत. मात्र या जवानांना कुठल्याचे भत्ते, मेडिक्लेम तसेच
सुरक्षा विमा कवच देण्यात आलेले नाही. परिणामी कर्तव्यावर असताना / नसताना आजारी पडल्याने जीव गमवावा लागला आहे. तसेच कोरोना काळात स्वखर्चाने या जवानांनी मास्क, सॅनिटायझर विकत घेऊ न स्वत:ची सुरक्षा केली. 7 जणांचा कोविडमुळे मृत्यू झाल्या तरी त्यांना इतर पोलीस विभागांप्रमाणे विशेष विमा कवच देण्यात आलेले नाही.

Back to top button