Pune Theft News : दीडशे घरफोड्या करणारी टोळी जाळ्यात | पुढारी

Pune Theft News : दीडशे घरफोड्या करणारी टोळी जाळ्यात

पुणे; पुढारी वृत्तसेवा : सशस्त्र दरोडा, घरफोड्या करणार्‍या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले. या टोळीने वाहने चोरी करून दिवसा रेकी करत रात्रीच्यावेळी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरात तब्बल 166 घरफोड्या केल्या असून, सात वाहनचोरीचे गुन्हे केले आहेत. एकूण 173 गुन्ह्यांचा छडा लावत पोलिसांनी 1 कोटी 22 लाख 44 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये सव्वा किलो सोन्याचे दागिने, एक किलो चांदी, तीन पिस्तुले, 14 राऊंड आणि चोरीच्या दहा वाहनांचा समावेश आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पोलिस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे आदी उपस्थित होते.

अजयसिंह अर्जुनसिंह दुधानी (23,रा. मांजरी), बच्चनसिंह जोगिंदरसिंग भोंड (25, वैदवाडी), रामजितसिंह रणजिंतसिंह टाक, कणवरसिंह काळूसिंह टाक, संतोष शिवाजी पारगे (45, रा. हडपसर), गोपीनाथ जालिंदर बोराडे (29), रोहितसिंह सुरेंद्रसिंह जुनी (22), आरती मंगलसिंह टाक (32), कविता मनुसिंह टाक (30) यांच्यासह इतर आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हडपसर भागातील दरोड्याच्या गुन्ह्यात फरार आरोपी हे फुरसुंगी गावातील झाडींमध्ये लपल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून दुधानी, भोंड यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आरोपींकडून तीन पिस्तुले, 14 जिवंत काडतुसे, मोबाईल, कटावणी, कोयता असा मुद्देमाल जप्त केला. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी साथीदार तिलकसिंह, रामजितसिंह, करणसिंह, अक्षयसिंह तसेच कणवरसिंह यांच्या मदतीने शहर परिसरात गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यानुसार युनिट पाचच्या पथकाने रामजितसिंह, कणवरसिंह यांना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी पुणे शहर, पिंपरी आणि जिल्ह्यातील विविध भागांत घरफोड्या केल्याचे कबूल केले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे अपर पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनिल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट तीनचे वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, खंडणीविरोधी पथक एकचे वरिष्ठ निरीक्षक अजय वाघमारे, अशोक इंदलकर, राहुल पवार, अजितकुमार पाटील, राजेंद्र पाटोळे, विकास जाधव, शाहीद शेख, संतोष क्षीरसागर, संजय भापकर, सयाजी चव्हाण, किरण ठवरे, सुरेंद्र साबळे, ज्ञानेश्वर चित्ते, राकेश टेकावडे, निखील जाधव, सोनम नेवसे, भाग्यश्री वाघमारे यांच्यासह पथकाने ही  कामगिरी केली.

हेही वाचा

समाजभान : डेटिंग अ‍ॅप्सचा भूलभुलैया

भाजपला हिंदुत्व शिवसेनेने शिकवले; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई : वांगणी- बदलापूर दरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड; वाहतूक विस्‍कळीत

Back to top button