सोनोरीत रानडुकरांकडून अंजीरबागांचे नुकसान : शेतकरी मेटाकुटीला | पुढारी

सोनोरीत रानडुकरांकडून अंजीरबागांचे नुकसान : शेतकरी मेटाकुटीला

दिवे : पुढारी वृत्तसेवा : सोनोरी (ता. पुरंदर) परिसरातील अंजीरबागांचे रानडुकरांकडून नुकसान होऊ लागले आहे. पाण्याच्या शोधात आलेली रानडुकरे बागेत शिरत असून, मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान करीत आहेत. या प्रकारांमुळे अंजीर उत्पादक शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सोनोरी परिसरात मोठ्या प्रमाणावर अंजीर बागा आहेत. सध्या पाण्याची टंचाई असतानाही येथील शेतकर्‍यांनी आपल्या बागा मोठ्या कष्टाने जगवल्या आहेत. मात्र अंजीर उत्पादक शेतकरी आता रानडुकरांच्या हैदोसाने पुरते वैतागलेले आहेत. सध्या पाण्याची टंचाई असल्याने रात्रीच्या वेळी रानडुकरांचे कळप अंजीर बागांत घुसूत आहेत. त्यानंतर बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत.

येथील शेतकरी शिवाजी शिंदे यांच्या अंजिराच्या बागेत सध्या अंजीर विक्रीसाठी निघू लागला आहे. मात्र, मागच्या काही दिवसांपासून बागेत रानडुकरांचा हैदोस वाढला आहे. शिंदे यांच्या अंजीर झाडांची आळी रानडुकरांनी उकरली आहेत, त्यामुळे झाडांच्या मुळ्या उघड्या पडल्या आहेत. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला असून झाडे सुकण्याचा धोका निर्माण झाल्याचे शिंदे यांनी सांगितले.
ऐन दुष्काळात पुरंदर उपसा जलसिंचन योजनेने व शेततळ्यांनी तारले, परंतु रानडुकरांनी मारले, अशी गत झाल्याचे शिंदे यांनी सांगितले. वन विभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

हेही वाचा

Back to top button