भाजपला हिंदुत्व शिवसेनेने शिकवले; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल | पुढारी

भाजपला हिंदुत्व शिवसेनेने शिकवले; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : शिवसेनाप्रमुखांनी जेव्हा हिंदुत्वाचा नारा दिला तेव्हा भाजपलाही सोबत घेतले होते. त्यापूर्वी भाजपचे केवळ २ खासदार निवडून आले होते. पण २०१४ पासून भाजपचे लोक शिव- सेना संपवायला निघाले आहेत. परंतु भाजपला खऱ्या अर्थाने हिंदुत्व शिकवले ते शिवसेनेने. त्यामुळे शिवसेना शिल्लकच ठेवायची नाही हा भाजपचा अजेंडा आहे. जर हे मुळावरच आले असतील तर मी वागतोय ते चूक की बरोबर, असा सवाल करत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर हल्लाबोल केला.

शिवसेनेने (ठाकरे गट) शनिवारी दादर येथील शिवाजी मंदिरात ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी संमेलन आयोजित केले होते. ज्येष्ठ शिवसैनिकांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. सर्व जुने शिवसैनिक नव्या दमाने मला भेटताहेत. कारण आमचे लहानपण तुमच्यासोबत गेले आहे आणि तोच दरारा आजही आहे, अशा भावना ठाकरेंनी व्यक्त केल्या.
बाळासाहेबांच्या मृत्यूनंतर भाजपाने शिवसेना संपवायचा घाट घातला, कारण महाराष्ट्रात यांना कुणी जर रोखणारे असेल ती शिवसेना आहे. दुसऱ्या कुणाच्यात हिंमत नाही. शिवसेना संपत नाही म्हटल्यावर ती चोरायला निघालेत, अशी टीकाही त्यांनी केली. ठाकरे म्हणाले, हे संकट नाही तर ही एक संधी आहे. देव पुन्हा पुन्हा संधी देत नसतो. शिवसेनेला संपवायला हे सगळे उभे आहेत. त्यात आणखी कोणाला जायचंय त्यांनी जा आणि मग शिवसेना काय आहे ते दाखवतो, असा इशारा देतानाच ज्या शिवसेनेच्या ताकदीमुळे तुम्ही मोठे झालात ती ताकदच तुम्हाला अजून कळलेली नाही. तुम्ही फक्त वरवरचा फेस घेऊन गेलात. वर आलेली फुलं कदाचित तुम्ही तोडली असतील, पण मुळं माझी अजूनही घट्ट आहेत. जोपर्यंत ती घट्ट आहेत कोणीही मुळावर येऊ दे त्यांचे एक घाव दोन तुकडे करायला आम्ही समर्थ आहोत, असा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button