Neelam Gorhe : स्वच्छतेच्या जागरुकतेबाबत पुण्यात चांगले कार्य : गोर्‍हे | पुढारी

Neelam Gorhe : स्वच्छतेच्या जागरुकतेबाबत पुण्यात चांगले कार्य : गोर्‍हे

पुणे; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातीलच नव्हे, तर भारतातल्या उत्तम कार्यपद्धती राबविण्यात पुणे शहराचा समावेश होईल, असे काम झालेले आहे. शहर स्वच्छतेच्या अनुषंगाने गुणवत्तेची जाणीव तळागाळात निर्माण व्हावी, या दृष्टिकोनातून शहरात पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्था व अपार्टमेंट महासंघ आणि नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी संस्थेमार्फत चांगले काम होत असल्याचे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी व्यक्त केले.

सहकार विभाग, पुणे जिल्हा माण आणि अपार्टमेंट महासंघ, नॅशनल सोसायटी फॉर क्लीन सिटी (एनएससीसी) आणि पुणे महानगरपलिका यांच्या वतीने आयोजित ’हाऊसिंग सोसायटी अँड क्वालिटी सिटी’ या परिषदेत डॉ. गोर्‍हे बोलत होत्या. या वेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, पुणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप कदम, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघाचे अध्यक्ष सुहास पटवर्धन, एनएससीसीच्या अध्यक्षा शामला देसाई, सचिव मैथिली मनतवार आदी उपस्थित होते. सुरुवातीस डॉ. गोर्‍हे आणि मंत्री पाटील यांनी प्रदर्शनाला भेट देऊन माहिती घेतली.

लोकसहभागातून सुविधांसाठी प्रयत्न करू : चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, की 2014 ते 19 या काळात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना शासनाची एकही इमारत यापुढे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा निर्मिती करणारी नसेल, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प नसल्यास त्यांना अर्थसंकल्पात निधी मिळणार नाही, असा निर्णय घेण्यात आला होता. गुणवत्तापूर्ण शहर निर्मितीच्या दृष्टीने याची अंमलबजावणी होणे गरजेचे असून, त्यासाठी आवश्यक निधी शासकीय, तसेच लोकसहभागातून मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

पन्नास टक्क्यांहून अधिक सोसायट्यांचे डीम्ड कन्व्हेअन्स बाकी : संजय राऊत

पुणे शहरात 20 हजार गृहरचना सहकारी संस्था आणि 15 हजार अपार्टमेंट्स आहेत. त्यापैकी 7 हजार संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण (डीम्ड कन्व्हेअन्स) पूर्ण झाले आहे. विकसकाने स्वतःहून 2 ते 3 हजार केलेले असून, म्हाडाच्या किंवा शासकीय जागेवरील 700 ते 1 हजार संस्थांचे डीम्ड कन्व्हेअन्स झाले आहे. याचा विचार करता पन्नास टक्क्यांहून अधिक संस्थांचे मानीव अभिहस्तांतरण बाकी असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (शहर) संजय राऊत यांनी या वेळी दिली. शुक्रवारी सायंकाळच्या सत्रात ते बोलत होते. या वेळी पत्रकार मुकुंद संगोराम, अ‍ॅड. शंतनू खुर्जेकर, अ‍ॅड. श्रीप्रसाद परब, सहकार भारतीचे गृहनिर्माणचे राहुल पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Pune Onion Market : कांद्यामुळे डोळ्यात पाणी; बाजारात 65 ते 70 रुपये प्रतिकिलोने विक्री

नथीपासून पैंजणापर्यंत सर्व दागिने कागदाचेच

Weather Update : महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड

Back to top button