Pune Onion Market : कांद्यामुळे डोळ्यात पाणी; बाजारात 65 ते 70 रुपये प्रतिकिलोने विक्री | पुढारी

Pune Onion Market : कांद्यामुळे डोळ्यात पाणी; बाजारात 65 ते 70 रुपये प्रतिकिलोने विक्री

पुणे; पुढारी वृत्तसेवा : दक्षिणेकडील राज्यांत पावसाने पाठ फिरविल्याने कांद्याच्या उत्पादनात झालेली घट, तर गतवर्षी गारपीट, अवकाळीच्या फटक्यामुळे चाळीतील कांदा खराब होण्याचे प्रमाण वाढल्याने बाजारात कांद्याने दरवाढीकडे वाटचाल सुरू केली आहे. दरवर्षीच्या तुलनेत कांद्याची साठवणूक व बाजारातील आवक कायम असली तरी दर्जेदार मालाचे प्रमाण कमी आहे. परिणामी, शुक्रवारी गुलटेकडी मार्केट यार्डातील घाऊक बाजरात कांद्याला किलोला 45 ते 58 रुपये दर मिळाला. तर, किरकोळ बाजारात कांद्याची 65 ते 70 रुपये किलो दराने विक्री सुरू होती.

कांद्याचे व्यापारी रितेश पोमण म्हणाले, नवरात्रोत्सवापूर्वी देशातील अनेक शहरांमध्ये कांदा सरासरी 28 ते 36 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. मात्र गेल्या काही दिवसांत कांद्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. मागील वर्षी कांदा साठवण्यापुर्वी फेब—ुवारी व मार्चमध्ये कांद्याच्या पिकाला गारपीट व अवकाळीचा फटका बसला. परिणामी, पाण्याचा अंश असल्याने कांदा वखारीत कांदा लवकर खराब होऊ लागला. त्यामुळे, शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात कांदा बाजारात आणण्यास सुरवात केली आहे. बाजारात दाखल होत असलेल्या कांद्यामध्ये अवघा 15 ते 20 टक्के कांदा दर्जेदार असून त्याला चांगला दर मिळत आहे.

दोन महिन्यांपूर्वी घाऊक बाजारात कांद्याचे प्रतिकिलोचे दर 25 रुपयांपर्यंत गेले होते. कांद्यासाठी हे दर समाधानकारक असल्याने शेतकर्‍यांनी चाळीतील कांदा विक्रीस काढला. दरम्यान, यंदा दक्षिणेतील राज्यांमध्ये पावसाने पाठ फिरविल्याने कांदा लागवडीत घट झाली.  परिणामी, येथील स्थानिक बाजारपेठांमध्ये मुबलक कांदा नसल्याने त्यांनी राज्यातील बाजारपेठांमधून कांदा खरेदीस सुरवात केली आहे. राज्यासह परराज्यातूनही वाढलेली मागणी व दर्जेदार  मालाचे कमी झालेले प्रमाण यांमुळे कांद्याच्या दरात वाढ झाल्याचे पोमण यांनी नमूद केले.

हेही वाचा

नथीपासून पैंजणापर्यंत सर्व दागिने कागदाचेच

Weather Update : महाबळेश्वरपेक्षा पुणे थंड

ब्रेकिंग! अजित पवारांना डेंग्यूची लागण

Back to top button