Bajrang Punia Suspend : कुस्तीपटू बजरंग पुनियाचे निलंबन! डोप टेस्ट न दिल्याने NADA ची कारवाई | पुढारी

Bajrang Punia Suspend : कुस्तीपटू बजरंग पुनियाचे निलंबन! डोप टेस्ट न दिल्याने NADA ची कारवाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : Bajrang Punia Suspend : ऑलिम्पिक पदक विजेता बजरंग पुनिया याला राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेने (नाडा) निलंबित केले आहे. नाडाच्या या निर्णयामुळे बजरंग पुनियाच्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये जाण्याच्या मोहिमेला मोठा धक्का बसू शकतो. पुनियाने 10 मार्च रोजी सोनीपत येथे झालेल्या निवड चाचणीत डोप चाचणी दिली नव्हती. त्यामुळे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे, असा खुलासा नाडाने केला आहे.

नाडाने आपल्या निवेदनात म्हटलंय की, 10 मार्च रोजी नाडाने बजरंग पुनियाला सोनीपत येथे झालेल्या चाचण्यांदरम्यान लघवीचा नमुना देण्यास सांगितले होते. पण ऑलिंपिक विजेत्या पैलवानाने यास नकार दिला. त्यामुळे नाडाने वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सीला (वाडा) याबाबत माहिती दिली. यानंतर वाडाने नाडाला बजरंगला नोटीस बजावून चाचणी का नाकारली याचे उत्तर देण्यास सुचवले. अशा परिस्थितीत नाडाने बजरंग पुनियाला 23 एप्रिल रोजी नोटीस बजावली आणि 7 पर्यंत उत्तर देण्यास सांगितले. बजरंग जेव्हा नाडाला उत्तर देईल तेव्हाच सुनावणीची तारीख ठरवली जाईल. यादरम्यान, एनएडीआर 2021 च्या कलम 7.4 नुसार, पुनियाचे तात्पुरते निलंबन करण्यात आले आहे. हे निलंबन मागे घेतले जात नाही तोपर्यंत तो कोणत्याही स्पर्धेत किंवा चाचण्यांमध्ये भाग घेऊ शकणार नाही. हे आरोप कायम राहिल्यास तो ऑलिम्पिकच्या निवड चाचणीत सहभागी होऊ शकणार नाही.’ (Bajrang Punia Suspend)

बजरंग पुनियाचा ट्रायल्समध्ये पराभव

पॅरिस ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी आयोजित राष्ट्रीय निवड चाचणीत बजरंग पुनियाला पराभवाचा सामना करावा लागला. टोकियो ऑलिम्पिक (2020) कांस्यपदक विजेत्या बजरंगला 65 किलो फ्रीस्टाइल वजन गटाच्या उपांत्य फेरीत कुस्तीपटू रोहित कुमारने अस्मान दाखवले होते. या वर्षी 26 जुलै ते 11 ऑगस्ट दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकचे आयोजन फ्रान्समध्ये होणार आहे.

पुनियाने बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी त्याने पुरुषांच्या फ्रीस्टाइल 65 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कॅनडाच्या एल. मॅक्लीनचा 9-2 असा पराभव केला होता. राष्ट्रकुल स्पर्धेत पुनियाचे हे सलग दुसरे आणि एकूण तिसरे सुवर्णपदक ठरले. मात्र, त्यानंतर त्याला विशेष कामगिरी करता आलेले नाही. हँगझोऊ आशियाई स्पर्धेतही पुनियाने निराशा केली होती.

भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये बजरंग पुनिया यांचा समावेश होता. पुनियाने नुकतेच युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (युडब्ल्यूडब्ल्यू) ला पत्र लिहून डब्ल्यूएफ विरुद्ध कारवाई करण्याची विनंती केली होती. तथापि, काही दिवसांनंतर, युडब्ल्यूडब्ल्यूने डब्ल्यूएफआयवरील बंदी उठवली.

Back to top button