पुणे : कौटुंबिक वादातून दिराने केला भावजयीचा खून | पुढारी

पुणे : कौटुंबिक वादातून दिराने केला भावजयीचा खून

पुणे, पुढारी वृत्तसेवा : कौटुंबिक वादातून दिराने आपल्या भावजयीचा खून केला. ही घटना शुक्रवारी (दि.११) दुपारी दिड वाजताच्या सुमारास मारुतीनगर वडगावशेरी येथे घडली. लक्ष्मीबाई श्रीराम (वय ५४,रा. चंदनगर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी चंदनगर पोलिसांनी दीर श्रिनिवास श्रीराम याला अटक केली आहे. याबाबत सागर रमेश दासा (वय ३९, रा. मारुतीनगर वडगांवशेरी) यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार श्रीनिवास याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीनिवास आणि खून झालेली महिला लक्ष्मीबाई हे दोघे नात्याने दीर-भावजयी आहेत. तर फिर्यादी सागर हे देखील श्रीनिवास याचे मित्र होते. सागर यांना देवीची परडी भरण्याचा क्रार्यक्रम करायचा होता. श्रीनिवास याने त्याची भावजाई लक्ष्मीबाई या परडी भरण्याचा कार्यक्रम करतात असे सांगितले होते.

दुपारी लक्ष्मीबाई या सागर यांच्या घरी आल्या. हे श्रीनिवास याने पाळत ठेवून पाहिले होते. तो सागर यांच्या घरी आला. त्याने सागर यांच्या पत्नीला काहीतरी घेऊन येण्यासाठी बाहेर पाठवले. तर सागर हे देखील बाहेर गेले होते. त्यावेळी श्रीनिवास याने आपल्या बरोबर आणलेल्या चाकूने घरात शिरून लक्ष्मीबाई यांचा गळा चिरला. गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. सागर व त्यांची पत्नी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना लक्ष्मीबाई रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांनी याची माहिती चंदनगर पोलिसांना दिली होती.

घटनेची माहिती मिळताच, पोलिस उपायुक्त रोहिदास पवार, सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. लक्ष्मीबाई यांचा खून केल्यानंतर श्रीनिवास याने तेथून पळ काढला होता. तो शहरात विविध ठिकाणी फिरत असून, सध्या तो वडगावशेरी परिसरात आल्याची माहिती पोलिस हवालदार सचिन कुटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अरविंद कुमरे, कर्मचारी रामचंद्र गुरव, नानासाहेब पतुरे, शेखर शिंदे, अनुप सांगळे, संदीप गायकवाड, प्रदीप धुमाळ यांच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत श्रीनिवास याने गुन्हा केल्याची कबुली दिली.

गेल्या काही वर्षापासून लक्ष्मीबाई व श्रीनिवास यांच्या कौटुंबिक कारणातून वाद सुरू होते. श्रीनिवास याची आई लक्ष्मीबाई यांच्या कुटूंबियासोबत राहते. त्याच्या म्हणन्यानुसार लक्ष्मीबाई यांनी त्याच्या घरावर करणी केली. त्याचा संशय त्याला होता. तसेच त्या श्रीनिवास याला आईला भेटू देत नव्हत्या. त्याच कारणातून त्याने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button