Jalgaon Crime | हॉटेलचा रिसेप्शनीस्टच निघाला चोर, पोलिसांकडे कबुली | पुढारी

Jalgaon Crime | हॉटेलचा रिसेप्शनीस्टच निघाला चोर, पोलिसांकडे कबुली

जळगाव पुढारी वृत्तसेवा – धुळे जिल्ह्यातील एक युवक कामानिमित्त दुबई येथे राहत असल्याने त्याच्या मित्रांना भेटण्यासाठी जळगाव येथे आला असता त्याच्या बॅगेतून एक लाख 70 हजार रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरीला गेला होता. ज्या हॉटेलमध्ये तो थांबलेला होता त्या हॉटेलच्या रिसेप्शनिस्टनेच चोरल्याचे उघड झाले आहे. जिल्हापेठ पोलीसांनी  संशयिताला अटक केली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धुळे जिल्ह्यातील साक्री येथे राहणारा राहुल मधुकर जाधव हा नोकरी निमित्त दुबई येथे राहतो. तो जळगावला मित्रांना भेटण्यासाठी दि. 20 रोजी हॉटेल स्टार प्लस येथे थांबला होता. त्याचवेळी त्याची प्रकृती बिघडल्याने त्याने त्याची बॅग हॉटेलच्या रिसेप्शन काउंटरला ठेवली होती व तेथे असलेल्या सिंधू हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी दाखल झाला होता. उपचार घेतल्यानंतर 21 मे रोजी दुपारी रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर बॅग घेण्यासाठी हॉटेलमध्ये आला असता बँगेत ठेवलेली सोनसाखळी, दोन सोन्याचे पेंडल असा एक लाख 70 हजार रुपयांचा ऐवज चोरी झाल्याचे समोर आले. याबाबत त्याने पोलिसात धाव घेतली. गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सलीम तडवी, जुबेर तडवी, अमित मराठे, मिलींद सोनवणे, तुषार पाटील, जयेश मोरे यांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर स्टार हॉटेलमध्ये काम करणारा केतन धोंडू पाटील वय २९ रा. पाळधी ता. मुक्ताईनगर याला अटक केली. त्याने चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेला मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला असून पुढील तपास पोलीस नाईक राजेश पदमर हे करीत आहे.

हेही वाचा –

Back to top button