नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : स्वाती मालीवाल प्रकरणाला नऊ दिवस लोटूनही अरविंद केजरीवाल गप्प का, असा सवाल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केला. आम आदमी पक्ष आता महिला व दिल्लीविरोधी पक्ष बनला असल्याची टीकाही त्यांनी केली. दिल्लीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आले असताना भाजप मुख्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत ते बोलत होते.
सावंत म्हणाले की, स्वाती मालीवाल प्रकरणाला ९ दिवस लोटूनही केजरीवाल गप्प आहेत. मुख्यमंत्र्यांच्या १२० कोटींच्या महालात त्यांच्या २० वर्ष जुन्या महिला सहकाऱ्याशी गैरवर्तन करून मारहाण केली जाते. मात्र, तरीही मुख्यमंत्री गप्प बसतात, हा अत्यंत निर्लज्जपणा आहे.
एकीकडे स्वाती मालीवाल मारहाणप्रकरणी विभवकुमार यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आपचे खासदार संजय सिंह देतात तर, दुसरीकडे अरविंद केजरीवाल विभवकुमारला आपल्या गाडीत बसवून लखनौला घेऊन जातात, यातून काय सिद्ध होते, असा सवालही त्यांनी केला. घटना घडल्यानंतर विभव कुमारला मुख्यमंत्र्यांच्या घरीच लपवून दिल्ली पोलिसांना तपासासाठी घटनेचे योग्य सीसीटीव्ही फुटेज मिळू दिले नसल्याचा आरोप सावंत यांनी केला.
इंडिया आघाडीतील एका महिला नेत्याने महिलांच्या सन्मानासाठी 'लडकी हुं, लड सकती हुं' अशी घोषणा दिली होती. मात्र, स्वाती मालीवाल प्रकरणात त्या गप्प का आहेत, असा सवालही प्रमोद सावंत यांनी प्रियांका गांधी वधेरा यांचा नामोल्लेख टाळून केला.