...मग ही लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढू : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया | पुढारी

...मग ही लढाई आम्ही पूर्ण ताकदीने लढू : जितेंद्र आव्हाडांच्या अटकेनंतर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया

मुंबई, पुढारी वृत्तसेवा: आम्हाला जेलमध्ये जायला लागले तरी आम्ही जाऊ, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही. जितेंद्र आव्हाड यासाठी जेलमध्ये जात असतील, तर त्यांचा आम्हाला अभिमान आहे. राज्य सरकारने नक्की कुणाच्या बाजूने आहोत, याचे उत्तर दिले पाहिजे. तुम्ही छत्रपतींच्या विरोधात असाल, तर तसे स्पष्ट करा, मग ही लढाई पूर्ण ताकदीने लढू, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी आज ((दि.११) पत्रकार परिषदेत दिला.

सुळे म्हणाल्या की, या राज्यात चाललंय काय, जो चूक करतो. त्याला पूर्ण माफी आणि एखादा आंदोलन करतो, त्याला शिक्षा म्हणजे ब्रिटिश राज सुरू आहे का? असा सवालही खासदार सुळे यांनी उपस्थित केला. जितेंद्र आव्हाड हे लढवय्ये नेते आहेत. त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनला बोलावले. त्यामुळे ते गेले, त्यावेळी तिथे वरुन दबाव येतोय, असे पोलीस सांगत आहेत. मला कुणावर आरोप करायचे नाहीत. दबाव येतोय, त्यात पोलिसांची चूक नाही, आम्ही सत्तेत असो अथवा नसो मला महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान आहे. मात्र, त्यांच्यावर दबाव येतोय, ही चर्चा नाकारता येत नाही. हे या घटनेवरून स्पष्ट होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्याविरोधात चित्रपटात चुकीचे दाखवले जात असेल. आणि एखादी व्यक्ती त्या विरोधात वेदना मांडत असेल. आणि त्यासाठी त्यांना अटक होत असेल, तर या अटकेचे मनापासून स्वागत करत आहे. सत्ता काबीज करण्यासाठी माणसाने पातळी किती सोडावी, ही महाराष्ट्रासाठी लाजवणारी गोष्ट आहे, अशा शब्दांत सुळे यांनी नाराजी व्यक्त केली. छत्रपती शिवाजी महाराज ही दंतकथा नाही. ती आमची ओळख आहे, आमचा श्वास आहे. छत्रपतींबद्दल तुम्ही चुकीची माहिती देणार असाल, तर ते अयोग्य आहे. इतिहास खरा दाखवा, असे आवाहनही खासदार सुळे यांनी केले.

हेही वाचलंत का ? 

Back to top button