पुणे: पाबळ येथे मामाच्या गावाला आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू | पुढारी

पुणे: पाबळ येथे मामाच्या गावाला आलेल्या सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू

शिक्रापूर, पुढारी वृत्तसेवा : पाबळ (ता. शिरूर) येथे मामाच्या गावाला आलेल्या दोन शाळकरी सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (दि.२२) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. आर्यन संतोष नवले (वय १३) व आयुष संतोष नवले (वय १०, दोघे, रा. राहू, ता. दौंड) अशी मृत्युमुखी पडलेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, मृत आर्यन व आयुष हे दोघे मंगळवारी (दि. २१) पाबळ येथील मामा सचिन भाऊसाहेब जाधव यांच्याकडे सुट्टी लागल्याने आले होते. आज दुपारी साडे बाराच्या सुमारास हे दोघे घराशेजारी असलेल्या भाऊसाहेब बापू जाधव यांच्या शेततळ्याजवळ खेळत खेळत गेले. दोघांनी कपडे काढून शेततळ्यात उडी मारली. परंतु, पोहता येत नसल्याने व पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही शेततळ्यात बुडाले.

शेजारीच शेळ्या चारत असलेले त्यांचे आजोबा बाळासाहेब जाधव यांनी घटना पाहिल्यावर मदतीसाठी आवाज दिला. कैलास आण्णाजी जाधव यांनी दोघांना पाण्या बाहेर काढले. परंतु, दवाखान्यात दाखल करण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला. ही घटना समजाताच पाबळ व राहू येथे शोककळा पसरली. पुढील तपास शिक्रापूर पोलीस करत आहे.

Back to top button