सिंधुदुर्ग, ओरोसला वळीव पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले | पुढारी

सिंधुदुर्ग, ओरोसला वळीव पावसाचा तडाखा; झाडे पडली, पत्रे उडाले

ओरोस, पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्ग आणि ओरोस परिसरात वादळी वारे आणि विजेच्या कडकडाटासह आज (दि. २२) सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक झाडे उन्मळून पडली. तर काही ठिकाणी घरांची कौले, पत्रे उडून गेली. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सिंधुदुर्ग शहरात रस्त्यावर जागोजागी झाडे पडल्यामुळे वाहतुकीला अडथळे आले. कर्मचाऱ्यांना घरी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. सायंकाळी साडेपाचच्या दरम्यान पावसाने सुरुवात केली. ओरोस फाटा परिसरात असलेल्या नारायण मार्केट आणि त्या लगतच्या टपऱ्यांवरील पत्रे काही प्रमाणात उडाले. तर तेथील दुकानांमध्येही पाणी शिरले. तर हायवेवरील पथदिवे वाऱ्यामुळे हलू लागले होते. विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पडलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. अनेक लोक आपला जीव मुठीत घेऊन वावरत होते. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे ओरस फाटा येथील पुलाजवळील एक झाड उन्मळून चहाच्या टपरीवर पडले.

सिंधुदुर्ग जिल्हा मुख्यालय परिसरातील रस्त्यावर ठीकठिकाणी झाडे पडून वाहतूक खोळंबली होती. सायंकाळी सहा वाजता सुटणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन वाहने हाकावी लागली. मोठमोठे फलक रस्त्यावर तुटून पडलेले होते. वादळी पावसामुळे शहरात लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा 

Back to top button