अजित पवार, सुप्रिया सुळेंसाठी ‘पीएमआरडीए’चे सोयीचे आरक्षण : संजय भेगडे | पुढारी

अजित पवार, सुप्रिया सुळेंसाठी 'पीएमआरडीए'चे सोयीचे आरक्षण : संजय भेगडे

राजगुरूनगर : पुढारी वृत्तसेवा

‘पीएमआरडीए’ चे प्रस्तावित आरक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांना सोयीचे आणि शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवणारे असल्याचा सनसनाटी आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी राजगुरूनगर येथे केला.

अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यातील घोटावडे येथील फार्महाऊसची जमीन तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथील जागेवर रहिवासी आरक्षण टाकण्यात आले आहे. मात्र या दोन्ही जमिनीच्या लगतच्या सर्वसामान्य नागरिक, शेतकरी यांच्या क्षेत्रात जाणीवपूर्वक शेती झोन करण्यात आला आहे.

‘पीएमआरडीए’चे आरक्षण असे असेल तर त्याला आमचा तीव्र विरोध आहे. याविरोधात जिल्ह्याच्या ९ तालुक्यातील ८१४ गावांचे संभाव्य बाधित शेतकरी एकत्र करून तीव्र आंदोलन केले जाईल. या आंदोलनाने शेतकरी विरोधी महाआघाडी सरकारला जागे केले जाईल, असा इशारा संजय उर्फ बाळा भेगडे यांनी दिला.

खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने चांडोली, राजगुरूनगर येथे गुरुवारी (दि २) पीएमआरडीए रिंगरोड, बुलेट ट्रेन, रेल्वे मार्ग आराखड्याच्या विरोधात शेतकरी मार्गदर्शन मेळावा आयोजित केला होता. उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना भेगडे बोलत होते.
पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख,जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते शरद बुट्टे पाटील, दिलीप मेदगे, तालुकाध्यक्ष शांताराम भोसले यांच्यासह मेळाव्यात उपस्थित शेतक-यांनी आपल्या व्यथा मांडल्या.

संभाव्य बाधीत शेतकऱ्यांनी पीएमआरडीए सुचविलेल्या सर्व आराखड्याना विरोध केला. उपस्थितांनी दिलेल्या हरकती जमा करून घेतल्या.

प्रस्तावित पीएमआरडीए आराखडा विरोधात संतप्त भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. धरण ग्रस्तांचे पुनर्वसनासाठी गायरान, वन विभागाच्या जमिनीवर आरक्षण करा. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली निघेल असे जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांनी सांगितले. शरद बुट्टे पाटील यांनी शेतक-यांना मार्गदर्शन करताना सरकारवर आरोपाचे आसूड ओढले.

Back to top button