नाशिकमध्ये १ लाख भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण | पुढारी

नाशिकमध्ये १ लाख भटक्या कुत्र्यांचे निर्बीजीकरण

नाशिक : आसिफ सय्यद

मोकाट व भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने नाशिक महापालिकेच्या माध्यमातून गेल्या १६ वर्षांत तब्बल १ लाख ५ हजार ७८१ कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया अर्थात नसबंदी करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यानंतर नाशिक महापालिका भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरणामध्ये राज्यात आघाडीवर असली, तरी भटक्या कुत्र्यांच्या प्रजनन दराच्या तुलनेत दरवर्षी निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी असल्याने नाशिक शहरातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात महापालिकेला अद्यापही यश आलेले नाही.

संबधित बातम्या :

नागरी भागात मोकाट व भटक्या कुत्र्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे. यातून श्वानदंशाचे प्रकारही वाढत आहेत. विशेषत: लहान मुले व वयोवृद्धांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांना विषारी गोळी अन्नपदार्थात खायला घालून जिवे मारण्याचे प्रकार यापूर्वी घडत होते. परंतु प्राणीप्रेमींनी त्यास आक्षेप घेतल्यानंतर प्राणी संरक्षण कायद्यांतर्गत भटक्या कुत्र्यांना जिवे मारण्यास प्रतिबंध घालण्यात आला. ॲनिमल वेल्फेअर बोर्डाच्या निर्देशांनुसार भटक्या व मोकाट कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी भटक्या कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्याची अर्थात कुत्र्यांची नसबंदी करण्याची मुभा देण्यात आली. त्यानुसार मुंबई महापालिकेने १९९५ पासून, पुणे महापालिकेने २००० पासून, तर नाशिक महापालिकेने २००७ पासून शहरातील भटक्या व मोकाट कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यास प्रारंभ केला. नाशिक महापालिकेकडे यासाठी पशुवैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने कंत्राटीतत्त्वावर निर्बीजीकरण मोहीम राबविली जात आहे. १६ वर्षांपासून ही मोहीम सुरू असून, आतापर्यंत १ लाख ५ हजार ७८१ नर-मादी कुत्र्यांवर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

प्रतिवर्षी एक कोटीचा खर्च

भटक्या कुत्र्यांच्या निर्बीजीकरण मोहिमेसाठी महापालिकेच्या २०२३-२४ या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात एक कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षी ॲनिमल वेल्फेअर असोसिएशन पुणे या मक्तेदार संस्थेच्या माध्यमातून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मक्तेदाराची मुदत संपुष्टात आल्यानंतर जून २०२३ पासून जेनिस स्मिथ, सातारा या मक्तेदार संस्थेमार्फत निर्बीजीकरण मोहीम राबविली जात आहे. यासाठी प्रतिशस्त्रक्रिया ९९८ रुपये दर मक्तेदाराला अदा करण्यात येत आहे. निविदा कालावधीत 10 हजार कुत्र्यांवर शस्त्रक्रियेचे नियोजन आहे.

अशी राबविली जाते प्रक्रिया

शहरातील भटक्या कुत्र्यांना पकडून आणणे, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे व पुन्हा त्याच ठिकाणी सोडून देण्यासाठी मक्तेदाराने तीन पथके तयार केली आहेत. यात दोन पथकांमार्फत डॉग व्हॅनच्या माध्यमातून शहरातील भटके व मोकाट कुत्रे पकडून विल्होळी जकात नाका परिसरातील निर्बीजीकरण केंद्रात आणली जातात. या ठिकाणी तिसऱ्या पथकामार्फत कुत्र्यांची प्राथमिक वैद्यकीय तपासणी केल्यावर त्यांच्यावर निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. यासाठी दोन पशुवैद्यकीय डॉक्टर व १० कर्मचाऱ्यांची नियुक्ती मक्तेदाराने केली आहे. निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तीन दिवस या कुत्र्यांची देखभाल केली जाते. त्यानंतर त्यांना डॉग व्हॅनद्वारे जेथून आणले पुन्हा त्याच ठिकाणी सोडून दिले जाते.

यामुळे कुत्र्यांची संख्या नियंत्रणहीन!

कुत्री जन्माला आल्यानंतर वर्षभरातच प्रजननक्षम होतात. वर्षातून दोन वेळा प्रजनन होते. एका प्रजननाच्या वेळी आठ ते दहा पिले जन्मतात. एका मादीकडून वर्षभरात 15 ते 20 पिले जन्माला घातली जातात. नैसर्गिक मृत्युदर लक्षात घेता, त्यातील आठ ते दहा पिले जगतात. त्या तुलनेत महापालिकेच्या माध्यमातून निर्बीजीकरण केल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे महापालिकेने लाखाहून अधिक कुत्र्यांवर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केली असली, तरी कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यात यश मिळालेले नाही.

कुत्र्यांच्या प्रजनन दराच्या तुलनेत महापालिकेच्या माध्यमातून निर्बीजीकरण शस्त्रक्रिया केल्या जाणाऱ्या कुत्र्यांची संख्या कमी आहे. निर्बीजीकरण शस्त्रक्रियेचा वेग वाढल्यास कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवणे शक्य आहे. अर्थात यासाठी दरवर्षी उपलब्ध होणारी अंदाजपत्रकीय तरतूद वाढवणे गरजेचे आहे.- डॉ. प्रमोद सोनवणे, पशुवैद्यकीय अधिकारी, मनपा.

श्वान निर्बीजीकरणाची वर्षनिहाय स्थिती

वर्ष निर्बीजीकरणाची संख्या

२००७-०८ १७४९

२००८-०९ ४४५७

२००९-१० ८३७४

२०१०-११ ९६१६

२०११-१२ १०,१४८

२०१२-१३ २८०१

२०१३-१४ ६७११

२०१४-१५ ६८०३

२०१५-१६ ६३१४

२०१६-१७ ६४६०

२०१७-१८ ८८९७

२०१८-१९ ७८५२

२०२०-२१ ६१८७

२०२१-२२ ७९८८

२०२२-२३ १०,५२७

२०२३-२४ (जुलैपर्यंत) १६९७

हेही वाचा ;

Back to top button