कोल्हापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या युवकाचा कासारी धरणात बुडून मृत्यू | पुढारी

कोल्हापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या युवकाचा कासारी धरणात बुडून मृत्यू

विशाळगड; पुढारी वृत्तसेवा : शिवकालीन किल्ले विशाळगड मार्गावरील गजापूर (ता. शाहूवाडी) येथील कासारी धरणाच्या जलाशयात अंघोळीसाठी उतरलेल्या युवकाचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला. महमंद बाशा रसूल शाडपुडी (वय १८ रा.बानसंद्रा. ता.सुर्वेकरी, जि.तुमकूर. कर्नाटक) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१०) सकाळी आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी हसनमिया यगलार यांनी शाहूवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शाडपुडी व एलगार कुटूंब क्रूझर गाडीने (के.ए. ३५, ५१३७) रात्रभर प्रवास करून गुरुवारी (दि.९) विशाळगडाकडे जात होते. महमंदही कुटुंबासह  विशाळगड देवदर्शनासाठी आला होता. यादरम्यान गजापूर येथील सतीचा गौंड परिसरातील कासारी धरणाच्या बाजीप्रभू जलाशयाकडे अंघोळीसाठी त्यांनी गाडी धरण पात्राकडे वळवली. महंमद आंघोळीसाठी पाण्यात उतरला असता पाण्याचा अंदाज न आल्याने महमंद जलाशयात बुडून मृत्यू झाला.

महंमदला वडील नसल्याने कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी त्याच्यावर होती. संसाराचा गाडा हाकण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर घाला घातला. महंमदचे दहावीपर्यंत शिक्षण झाले आहे. तो आपल्या तीन बहिणी, आई, भाऊजी हसनमिया यगलार आणि इतर नातेवाईकांसमवेत विशाळगड येथे देवदर्शनासाठी आला होता. मात्र दर्शन घेण्यापूर्वीच त्याला मृत्यूने कवटाळले. घटनास्थळी नातेवाईक व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र तो आढळून आला नाही.

अखेर कोल्हापूर येथील रेस्कू पथकाला पाचारण करण्यात आले. दुपारी दोन वाजता कोल्हापूर येथील आपत्कालीन व्यवस्था पथक दाखल झाले. त्यांनी दीड तासात महंमदचा मृतदेह पात्राबाहेर काढला. मलकापूर ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून त्याचा मृत्यदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आई व तीन बहिणींनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याच्या पश्चात आई, तीन बहिनी असा परिवार आहे. घटनास्थळी पी.एस.आय. विजय घेवदे, पोलिस पाटील विठ्ठल वेल्हाळ उपस्थित होते.

…पर्यटकांनी खबरदारी घ्यावी…

कासारी धरण विशाळगड मार्गालगत असल्याने जलाशयाचा मोह पर्यटकांना आवरत नाही. जेवण व अंघोळीसाठी पर्यटक येथे थांबतात. जलाशय गाळयुक्त असल्याने व पाण्याचा ओढा आत असल्याने पर्यटकांना पाण्याचा व गाळाचा अंदाज येत नाही. याठिकाणी खोलवर पाण्यात जाऊन गाळात रुतल्यामुळे अनेकांनी मृत्यू ओढावला आहे. अशा दरवर्षी पाच-सहा घटना येथे घडतात. त्यामुळे पर्यटकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे.

हेही वाचा :

Back to top button