अभिजात भाषा दर्जा दूरच, मराठीची शब्दसंख्या घटली! | पुढारी

अभिजात भाषा दर्जा दूरच, मराठीची शब्दसंख्या घटली!

सुरेश पवार

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी अहवाल देऊन दहा वर्षे उलटली, तरी हा दर्जा मिळण्याचे काही लक्षण दिसत नसतानाच, मराठी भाषेतील शब्दसंख्या घसरल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. 1857 मध्ये मोल्सवर्थ यांनी तयार केलेल्या मराठी शब्दकोशात 60 हजार शब्द होते. 1932 साली महाराष्ट्र शब्दकोशाचे आठ खंड प्रसिद्ध झाले. त्यात मराठीचे एक लाख 30 हजारांहून थोडे अधिक शब्द होते. 2013 मध्ये प्रकाशित झालेल्या मराठी शब्दकोशात एक लाख 13 हजार शब्द होते. म्हणजे सुमारे 80 वर्षांत मराठी भाषेतील 17 हजारांहून अधिक शब्द कमी झाले. तेरा टक्के शब्दांनी मराठीची घसरण झाली. गेल्या 50 वर्षांत जीवनशैली बदलत गेली आणि अलीकडे त्याला खूपच वेग आला आहे. बदलत्या जीवनशैलीत स्वयंपाक घराचे किचन झाले. चूल, वैल, जाते, पाटा-वरवंटा, बंब, घंगाळ, विसन, उखळ, मुसळ असे शब्द अडगळीत गेले. खेडी बदलली. अलुतेदार, बलुतेदार, बैते असे शब्द इतिहासजमा होत चालले. शेतीतील मोट, नाडा, खळे, मळणी असे शब्द वापरातून गेले. आता हळूहळू अशासारखे शब्द व्यवहारातून गेले आणि शब्दकोशातूनही त्यांचे अस्तित्व कमी होत चालले आहे.

दरम्यानच्या काळात अनेक तांत्रिक शब्द मराठीत रूढ झाले. ते सरळ इंग्रजीतून आले आहेत. मोबाईल, रिंगटोन, यूट्यूब, व्हॉटस् अ‍ॅप असे अनेक शब्द मराठीत रूढ झाले आहेत. खरे तर गेल्या अनेक शतकांपासून अरबी, फार्सी, पोर्तुगीज अशा विविध भाषांतील शब्द मराठीत रूढ झालेले आहेत. तुर्क, मोगल यांच्या आक्रमणातून लष्करी, राजकारभारविषयक शब्द मराठीत आले. संस्कृत-महाराष्ट्री-मराठी या मराठीच्या जडणघडणीत संस्कृत भाषेचे हजारो शब्द मराठीत आले आहेत. मराठी शब्दसंख्या अशी वाढत गेली. पण आता ती खुंटल्याचे दिसत आहे.

या उलट, ज्ञानभाषा म्हटली जाणार्‍या इंग्रजी भाषेची शब्दसंख्या हेवा वाटावी अशी आहे. ऑक्सफर्डच्या ताज्या शब्दकोशात 6 लाख, तर कॉलिन्सच्या शब्दकोशात 7 लाख 50 हजार शब्द आहेत. इंग्रजी भाषेने इतर भाषेतील शेकडो शब्द आत्मसात केले आहेत. घेरावसारखा शब्दही इंग्रजीत आहे. मराठीत मात्र अशी भर पडत नसल्याचे जाणवत आहे.

देशातील प्रमुख 22 भाषांत मराठीचा क्रमांक तिसरा आहे. देशातील दहा टक्के लोक मराठी बोलतात. पण मराठी शब्दांची घसरण होत राहिली, तर आणखी काही वर्षांनी मराठीची जागा दुसरी भाषा घेण्याची भीती आहे. वृत्तपत्रे आणि नियतकालिके यामध्ये एकेकाळी दर्जेदार मराठीचा वापर होत असे. प्रसंगानुसार चपखल म्हणी आणि वाक्प्रचारांचा उपयोग होत असे. आता प्रसिद्ध होणार्‍या मराठी वृत्तांत आणि लेखात मराठी व्याकरणाचा अचूक वापर, अचूक मराठी शब्द हे शोधावेच लागतात, असा काही वेळा अनुभव येतो. महाविद्यालयात आणि विद्यापीठात मराठी विषय घेणारे विद्यार्थी दुर्मीळ होत आहेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांतून शिकणार्‍या नव्या पिढीचा संवाद आता इंग्रजीतूनच होऊ लागला आहे. इंग्रजी माध्यमाला विरोध असायचे कारणच नाही. पण मराठी भाषेचे संरक्षण आणि संवर्धन आवश्यकच आहे. अडीच हजार वर्षांची परंपरा असलेली मराठी भाषा मृत होऊ नये, यासाठी सर्वंकष प्रयत्नांची आवश्यकता आहे.

Back to top button