OBC Reservation : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाकडून शासन निर्णयाची होळी  | पुढारी

OBC Reservation : राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाकडून शासन निर्णयाची होळी 

चंद्रपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला सरसकट ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये या प्रमुख मागणीकरीता चंद्रपुरात दहा दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांच्या समर्थनात आज (दि. 20) बुधवारी गांधी चौकात शासनाने काढलेल्या निर्णयाची होळी केली. गुरूवारी आंदोलनस्थळी युवक सामूहिक मुंडन करणार आहेत.
राज्यात सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची ठिणगी चंद्रपुरात पहायला मिळाली. मराठा समाजाच्या जालन्यात सुरू असलेल्या जरांगे पाटील यांच्या, मराठा समाजाला सरसकट कुणबी समाजात सामील करावे या मागणी विरोधात चंद्रपूरात रविंद्र टोंगे यांनी हे आंदोलन सुरू केले आहे. मराठा समाजाच्या मागणीचा चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तीव्र विरोध केला आहे. ओबीसी (विजा, भज आणि विमाप्र, इत्यादी) समाजात तब्बल 423 च्या वर जाती आहे. त्यामध्ये मराठा समाज समाविष्ठ झाले तर ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही. मराठा समाज आर्थिक दृष्ट्या सक्षम आहे. आतापर्यंत मराठा समाजाने मोठमोठे मोर्चे काढून मागणी रेटून धरली आहे. आत ओबिसी समाजाला संघटीत होऊन लढा देण्याची वेळ आली आहे.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी चंद्रपुरात पुढाकार घेत 17 सप्टेंबरला हजारो ओबीसी बांधवांच्या उपस्थिती महामोर्चा काढून आक्रोश व्यक्त केला होता. आज गांधी चौक राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाद्वारे गेल्या दहा दिवसापासून सूरू असलेल्या ओबीसी बंधू रविंद्र टोंगे यांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या समर्थनार्थ महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाचे ओबीसीकरण करण्याकरीता नुकत्याच काढलेल्या शासन निर्णयाची होळी  केली. टोंगे यांचा आजचा अन्नत्याग आंदोलनाचा दहावा दिवस आहे. यावेळी मनीषा बोबडे, गोमती पाचभाई, कुसुमताई उदार, मीनाक्षी गुजरकर, सरिता लोंढे, सुनीता काळे, प्रभा साळवे, सविता वैरागडे, ममता क्षीरसागर, सुलभा जक्कुलवार, रीना येरणे, कविता वैरागडे, सरला झाडे,रीना त्रिवेदी, रूपा जुमडे,सरोजिनी वैद्य,मनीषा यामावार,कल्पना यामावार,किरण पावसकर,माया चौधरी, रजनी गोखले,चंदाबाई सोरते,, स्नेहल चौधडे यांनी तीव्र निषेध व्यक्त केला.

गुरूवारी युवकांचे सामूहिक मुंडन

11 सप्टेंबर पासून राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी मराठा समजाला सरसकट ओबिसीमध्ये समाविष्ठ करू नये या प्रमुख मागणीकरीता अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. ओबिसी समाज बांधवानी या आंदोलनाला पाठींबा दिला आहे. उद्या गुरूवारी 21 सप्टेंबर 2023 ला दु पारी बारा वाजता उपोषणकर्ते रवींद्र टोंगे यांच्या आंदोलनस्थळी ओबीसी समाजातील युवक राज्य सरकारच्या निषेधार्थ मुंडन करणार आहेत.
हेही वाचा

Back to top button