छत्रपती संभाजीनगर पुढारी वृत्तसेवा : विस्मरण होणे सामान्य आहे. परंतु त्याचा परिणाम दिनचर्येवर होत असेल तर मात्र, अल्झायमर असण्याची शक्यता आहे. चोर पावलांनी येणाऱ्या या आजाराची वाढत्या वयात अधिक जोखीम असते. त्यामुळे वयाेमानानूसार होते, असे सहज न घेता डॉक्टरांना दाखवावे. लवकर निदान आणि उपचाराने रोगाला प्रतिबंध करता येते. तरी मेंदूला सतत काम आणि वाचन-चिंतनात गुंतवून ठेवले तर स्मृतीभ्रंश टाळता येतो. असे तज्ज्ञांनी सांगितले. (Alzheimer Day 2023)
दरवर्षी २१ सप्टेंबर हा जागतिक अल्झायमर जागरुकता दिन म्हणून साजरा केला जातो. वयोमानानुसार विसराळूपणा येतोच या गैरसमजातून बहुतांश जण विस्मृती, विस्मरण या आजाराला गांभीर्याने घेत नाहीत. या आजाराचे सुरुवातीस निदान करणे कठीण असते. वयानुसार हा आजार बळावतो. यात प्रामुख्याने मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. साध्या गोष्टी विसरत जातात. एखादी गोष्ट वारंवार सांगावी लागते, नुकत्याच घडलेल्या घटना आठवत नाहीत. (Alzheimer Day 2023)
दैनंदिन कामे करणे अवघड होते. मधूनच अशी व्यक्ती आक्रमक होते. नैसर्गिक विधीही समजत नाहीत. त्यामुळे त्यावरचे नियंत्रणही जाते. अनुवांशिक, बदलत्या जीवनशैलीमुळे स्मृतीभ्रंश होऊ शकतो. यावर विशिष्ट उपचार नाही, मात्र उपचाराने वाढत्या आजाराला प्रतिबंध, आजची लक्षणे उद्यावर लांबवता येतात. त्याहून अधिक उत्तम म्हणजे मेंदूला अॅक्टीह ठेवणे, मॉनिंग वॉक, व्यायाम, सामाजिक उपक्रमात सहभाग, लोकांशी संवाद आणि मन प्रसन्न ठेवावे, यामुळे उतारवयातही हा आजार लांब राहील, असे तज्ज्ञांनी सांगितले. (Alzheimer Day 2023)
वयोमानानूसार विसराळूपणा प्रत्येकात असतो. परंतु यात व्यक्ती रस्ते, घराचा पत्ता, नातेवाईकांचे चेहरे, नाव विसरतात. वस्तूं आठवत नाही. घरातही गोंधळ, चिडचिड करतात. अशावेळी म्हातारपणात होतेच असे न म्हणता डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. राहुल वाहटुळे, मेंदुविकारतज्त्र.
मेंदू सतत अॅक्टीव्ह ठेवणे, दररोज पेपर वाचतात, त्यातील शब्दकोडे, पझल सोडवतात. व्यायाम करतात, चिंतन करतात. विविध उपक्रमात सहभाग, संवाद ठेवतात. त्यांची स्मरणशक्ती उतारवयातही चांगली राहते. स्मृतीभ्रंशची शक्यता कमी असते.
– डॉ. मेराज कादरी, मानसोपचार तज्त्र