

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गंगापूर धरणात पुरेसा पाणीसाठा झाला असला, तरी जायकवाडी धरणातून कालव्यांमध्ये विसर्ग सुरू केल्याने नाशिककरांना धडकी भरली आहे. या धरणातील जलसाठा ३७ टक्क्यांपेक्षाही कमी झाल्यास मेंढीगिरी समितीच्या अहवालानुसार गंगापूर धरण समूहात ६१ टक्के, दारणा धरणसमूहात ५४ टक्के, तर पालखेड धरण समूहात ७३ टक्के जलसाठा ठेवून उर्वरित सर्व पाणी जायकवाडीच्या दिशेने सोडावे लागणार असल्याने नाशिककरांवरील पाणीकपात अटळ बनल्याची शक्यता आहे. दरम्यान, शासनाने नाशिकमधील धरणांतील जलसाठ्याची माहिती मागविल्याने नाशिककरांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.
संबधित बातम्या :
नाशिकला प्रामुख्याने गंगापूर व मुकणे धरण व काही प्रमाणात दारणा धरणातून पाणीपुरवठा केला जातो. सद्यस्थितीत गंगापूर धरण समूहात जवळपास ९० टक्के जलसाठा आहे. दारणा व मुकणे धरणातील पाणीपातळीदेखील समाधानकारक असल्यामुळे नाशिककरांना हे पाणी वर्षभर पुरू शकणार आहे. मराठवाड्याला जायकवाडी धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जायकवाडी धरणाला स्वत:चे पाणलोट क्षेत्र नाही. पावसाळ्यात नाशिक व नगरमधील धरणांतून गोदावरी नदीद्वारे वाहून येणाऱ्या पाण्यातून जायकवाडी धरण भरते. या धरणाची क्षमता १०५ टीएमसी अर्थात नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या एकूण जलधारण क्षमतेइतकी आहे. सद्यस्थितीत जायकवाडी धरणात ३७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा आहे.
मेंढीगिरी समितीच्या अहवालातील शिफारशींनुसार जायकवाडीत ३७ टक्क्यांपेक्षा कमी जलसाठा असल्यास जायकवाडीसाठी पाणी सोडण्याचे बंधन आहे. सद्यस्थितीत जायकवाडीतून मराठवाड्यातील कालव्यांना पाण्याचा विसर्ग केला जात आहे. जायकवाडीतील जलपातळी दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे नाशिकच्या धरणांतून जायकवाडीची तहान भागवावी लागण्याची शक्यता आहे. गंगापूर, दारणा धरणांतून पाणी सोडल्यास नाशिककरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार नाही. शिल्लक पाणीसाठा ३१ जुलै २०२४ पर्यंत पुरविण्यासाठी पाणीकपात करावी लागेल. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी राज्य शासनाने जलसंपदा विभागाकडून नाशिकच्या धरणांतील पाणीसाठ्याची माहिती मागविल्याने नाशिककरांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
अतिरिक्त पाण्याची नोंदणी
१५ ऑक्टोबर २०२३ ते ३१ जुलै २०२४ या कालावधीसाठी धरणांमधील पाणी आरक्षणाबाबत मागणी नोंदविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार नाशिककरांना पिण्यासाठी ६१०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी महापालिकेकडून नोंदविली जाणार आहे.
हेही वाचा :