संगमनेर, पुढारी वृत्तसेवा : तुम्ही पालकमंत्री आहात. पालकमंत्री म्हणून काम करा, मालक बनू नका, अशी टीका माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महसूमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर केली होती. दरम्यान, बाळासाहेब थोरत यांच्या टीकेला राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी पालकत्व कसे करावे, हे कुणी शिकविण्याची गरज नाही, असे प्रत्युतर राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे.
आपण महसूलमंत्री असताना टंचाई आराखडा तयार केला. तो संपूर्ण राज्याला भूषणावह असल्याचे सांगत सुटले. मात्र, गेल्या ३० ते ३५ वर्षापासून या संगमनेर तालुक्यातील जनतेला पाणी देऊ शकले नाही. मग कोणत्या अर्थाने त्यांचा टंचाई आराखडा राज्याला भूषणावह आहे हे त्यांनी सांगावे, अशा शब्दात राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता टीका केली.
राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, संपूर्ण राज्यात आपण वाळू उपशावर बंदी आणली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यात वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. त्यामुळे इथून पुढील काळात कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्के वाळूचा गोरख धंदा बंद झालाच पाहिजे. कोणी वाळू तस्करांना पाठीशी घालतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.