नाशिक : ७५ हजार थकबाकीदारांना मनपाकडून नोटिसा, १५ दिवसांचा ‘अल्टिमेटम’ | पुढारी

नाशिक : ७५ हजार थकबाकीदारांना मनपाकडून नोटिसा, १५ दिवसांचा 'अल्टिमेटम'

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकेच्या घरपट्टी थकबाकीचा आकडा शास्तीसह १८० कोटींवर पोहोचल्याने थकबाकी वसुलीसाठी नव्या वर्षात ढोल बजाव मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्यात येणार असून, ७५ हजार ९६२ थकबाकीदारांना कर भरण्याबाबतच्या नोटिसा बजावण्यात येणार आहेत. सर्व थकबाकीदारांना प्रत्यक्षात नोटिसा देण्यासह त्यांच्या मोबाइल क्रमांकावरही व्हाॅटसअपद्वारे नोटीस पाठविण्यात येत आहे. थकबाकी भरण्यासाठी थकबाकीदारांना १५ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे.

मनपाच्या उत्पन्नात डिसेंबरअखेरपर्यंत सुमारे ३०० कोटींची तूट आहे. त्यात मालमत्ताकर आणि पाणीपट्टीची रक्कमच अधिक आहे. चालू आर्थिक वर्षात आयुक्तांनी कर विभागाला मालमत्ताकराचे १५४ कोटींचे उद्दिष्ट दिले आहे. २७ डिसेंबरपर्यंत १२४ कोटी ७३ लाखांची वसुली झाली आहे. वसुलीचे प्रमाण चांगले असले तरी थकबाकीचा आकडा कमी होत नसल्याने मनपाने थकबाकीदार असलेल्या मालमत्ता जप्तीची कार्यवाही हाती घेतली आहे. ७५ हजार ९६२ थकबाकीदारांकडे १८० कोटींची थकबाकी आहे. आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मंगळवारी (दि.२७) विविध कर विभागाची बैठक घेत वसुलीचा आढावा घेतला.

मार्च २०२३ पर्यंत चालू आर्थिक वर्षाच्या वसुलीसह थकबाकीचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. त्यामुळे कर विभागाने बड्या थकबाकीदारांना नोटिसा (सूचनापत्र) पाठविण्याची कार्यवाही सुरू केली आहे. ७५ हजार ९६२ थकबाकीदारांकडे थकबाकी असलेल्या १८० कोटींपैकी १२८ कोटींची रक्कम केवळ शास्तीची आहे. थकबाकीदारांनी कर भरण्याकडे पाठ फिरविल्याने थकबाकीदारांकडून दोन टक्के शास्तीचा दंड वसूल केला जातो. त्यामुळे शास्तीचा आकडा प्रत्यक्ष करवसुलीपेक्षा अधिक झाला आहे.

विभागनिहाय बजावलेल्या नोटिसा

– नाशिक पूर्व :             १४,५९८

– पंचवटी :                         २२,७४७

– सातपूर :                         ८,७१९

– सिडको :                         १५,४३८

– नाशिक पश्चिम :             ४,७३३

– नाशिकरोड :             ९,७२७

एकूण :                         ७६,९६२

हेही वाचा :

Back to top button