Nashik News: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले | पुढारी

Nashik News: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News

याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील धोंडगव्हाणवाडी येथील चंद्रकांत नारायण पुरकर यांची मुलगी अश्विनी अर्जुन मुळाणे (वय ३१) हिचा विवाह 2012 मध्ये खतवड (ता. दिंडोरी) येथील अर्जुन सुदाम मुळाणे यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर काही दिवसांपासूनच मृत अश्विनी हिचा माहेरून पैसे आणण्यासाठी शारीरिक, मानसिक छळ सुरू झाला. पुरकर कुटुंबियांनी वेळोवेळी रक्कम देत भांडण मिटवण्याचा प्रयत्न केला. परंतु, पती अर्जुन, सासू हिराबाई, दीर प्रमोद वेळोवेळी विविध कारणांनी अश्विनीचा शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण करीत होते. Nashik News

त्यामुळे त्यांच्या जाचास कंटाळून आज शेततळ्यात मोठा मुलगा सिद्धेश अर्जुन मुळाणे (वय ९) लहान मुलगा विराज अर्जुन मुळाणे (वय ६) यांच्यासह उडी मारून जीवन संपविले. मध्यरात्री दोन मृतदेह पाण्यातून काढण्यात आले तर एक मृतदेह आज सकाळी मिळाला. उत्तरीय तपासणी नंतर खतवड येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, घटना समजताच मयत अश्विनीचे नातेवाईकांनी खतवड येथे धाव घेतली यावेळी तणावग्रस्त परिस्थिती निर्माण झाली होती. दिंडोरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक रघुनाथ शेगर यांनी घटनास्थळी धाव घेत नातेवाईकांची समजूत घालत तणाव दूर केला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता .वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.

Nashik News  नातेवाईकांचा समंजसपणा

मृत अश्विनीचे माहेरचे नातेवाईक यांनी पोलिसांत फिर्याद देत असताना केवळ ज्यांच्याकडून त्रास होता. त्यांच्याच विरोधात फिर्याद दिली. तसेच अंत्यविधी ही कोणताही वाद न करता स्मशानभूमीत विधिवत केला.

तर अश्विनी अन् तिच्या चिमुरड्यांचा जीव वाचला असता

अश्विनी काही महिन्यांपूर्वी पती व मुलांसह पिंपळगाव येथे गुण्या गोविंदाने राहत होती. मात्र, सासू व दीर यांनी त्यांना पुन्हा खतवड येथे घेवून गेले. व तिला पुन्हा त्रास देवू लागले. त्यामुळे अश्विनीने टोकाचा निर्णय घेतला, असे नातेवाईकांनी सांगितले.

हेही वाचा 

Back to top button