कोल्हापूर : हुल्लडबाज, गोवा मेड दारू तस्करीवर लक्ष | पुढारी

कोल्हापूर : हुल्लडबाज, गोवा मेड दारू तस्करीवर लक्ष

कोल्हापूर, गौरव डोंगरे : ‘थर्टी फर्स्ट’च्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस दल आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात येणार्‍या गोवा मेड दारूची तस्करी रोखण्यासाठी तपासणी नाके उभारण्यात आले आहेत. शहरातही हुल्लडबाजांवर कारवाईसाठी स्वतंत्र पथके कार्यरत करण्यात आली आहेत. नव्या वर्षाचे स्वागत करताना कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस खबरदारी घेत आहेत.

नव्या वर्षाच्या स्वागतच्या नावाखाली काही हुल्लडबाजांकडून सार्वजनिक शांततेला गालबोट लावण्याचे प्रकार घडतात. मद्यप्राशन करून वाहने चालविणार्‍यांमुळे सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागतो. कर्णकर्कश हॉर्नमुळे शांततेचा भंग केला जातो. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पोलिस दल सतर्क झाला आहे. शहरातील मुख्य चौक, वर्दळीची ठिकाणे, रस्त्यांवर कोणीही हुल्लडबाजी करणार नाही, यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शिवाजी पूल, शिरोली पूल, सरनोबतवाडी, शाहू नाका, शेंडा पार्क, कळंबा, नवीन वाशी नाका, शिंगणापूर नाका या ठिकाणी पोलिसांची पथके तैनात आहेत.

गोवा मेड दारूवर लक्ष

गोव्यातून चोरट्या मार्गाने जिल्ह्यात आणण्यात येणार्‍या दारूवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर राहणार आहे. यासाठी तिलारी (चंदगड), गवसे, कबनूर, गगनबावडा, राधानगरी, आंबा घाटात तपासणी नाके कार्यरत आहेत. यासाठी 2 अधिकारी, 2 जवान व अधिकारी असे पथक तैनात करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रवींद्र आवळे व उपअधीक्षक आर. एल. खोत यांच्या नेतृत्वाखाली ही पथके दिवस-रात्र तैनात आहेत.

ड्रंक अँड ड्राईव्हवर कारवाई

मद्य प्राशन करून वाहने चालविणार्‍यांची ‘ब्रेथ अ‍ॅनलायझर’द्वारे तपासणी केली जाणार आहे. मागील दोन वर्षांत कोरोना संसर्गामुळे ही तपासणी न करता संशयितांना पकडून वैद्यकीय चाचणीसाठी पाठविण्यात येत होते. यंदा मात्र ड्रंक अँड ड्राईव्हसाठी जागेवरच कारवाई केली जाणार आहे.

हुल्लडबाजांवर कारवाई

मोटारींमध्ये मोठ्या आवाजात टेपरेकॉर्डर लावणे, दुचाकींचे सायलेन्सर काढणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवत वाहने पळविणे, केक कापण्यासाठी हत्यारांचा वापर करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात येईल, असा इशारा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिला आहे.

Back to top button