Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार | पुढारी

Online fraud: फसवणूक टाळण्यासाठी नागरिकांना घरी जाऊन देणार प्रशिक्षण, नाशिक सायबर पोलिसांची पाच पथके तयार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माहितीचा अभाव, अज्ञानपण, भीतीपोटी अनेक नागरिकांना भामट्यांनी ऑनलाइन पद्धतीने गंडा घातला आहे. त्यामुळे नाशिक सायबर पोलिसांनी नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी पाच पथके तयार केली आहेत. ही पथके नागरिकांनी बोलावल्यास त्यांच्याकडे जाऊन ऑनलाइन खबरदारी कशी घ्यावी, फसवणूक कशी टाळावी, फसवणूक झाल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षण देत आहेत. आतापर्यंत हजारांहून अधिक नागरिकांना प्रशिक्षण दिल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले आहे.

देशभरातील भामटे ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना गंडवत असल्याचे प्रकार समोर येत असतात. त्यात नागरिकांकडील कोट्यवधी रुपये भामट्यांकडे गेले आहेत. नागरिकांच्या अज्ञानाचा, भीती घालून किंवा दमदाटी करीत भामटे गंडा घालत असतात. त्यामुळे वारंवार जनजागृती करून नागरिकांना सज्ञान करण्यावर सायबर पोलिसांनी भर दिला आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे व गुन्हे शाखेचे पोलिस उपआयुक्त संजय बारकुंड यांनी सायबर पोलिसांचे पाच पथक तयार केले आहेत. नाशिक शहरातील शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहतीतील कंपनी, खासगी सोसायटी, रहिवासी नागरिकांचा गट, व्यावसायिक, नोकरदारवर्ग किंवा 20 हून अधिक जणांच्या गटाने सायबर पोलिसांशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडे सायबर पोलिसांचे पथक जाते. हे पथक संबंधितांना ऑनलाइन व्यवहार करताना कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन करते. त्यानुसार या पथकांनी हजारहून अधिक नागरिकांना माहिती देत फसवणूक टाळण्याबाबत प्रबोधन केले आहे.

याबाबत दिली जाते माहिती
सायबर फसवणूक म्हणजे काय?
फसवणुकीचे प्रकार व ते कसे होतात?
फसवणूक टाळण्यासाठी कशी खबरदारी घ्यावी?
फसवणूक झाल्यास काय करावे?
ऑनलाइन व्यवहारात कोणती खबरदारी घ्यावी?

सायबरबाबत मोफत जनजागृती करण्यासाठी पथके तयार केली आहेत. ज्या नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत माहिती हवी असेल, त्यांनी 02532305226 या क्रमांकावर संपर्क करून वेळ व ठिकाण कळवावे. त्यानुसार सायबर पोलिस तेथे येऊन जनजागृती करतात. जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमाचा फायदा घ्यावा. जेणेकरून फसवणूक टळण्यास मदत होईल.
– सूरज बिजली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सायबर पोलिस

हेही वाचा :

Back to top button