थंड हवेच्या ठिकाणांना उष्णतेच्या झळा!; ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटन व्यवसाय मंदावला | पुढारी

थंड हवेच्या ठिकाणांना उष्णतेच्या झळा!; ऐन सुट्ट्यांच्या हंगामात पर्यटन व्यवसाय मंदावला

पालघर : निखिल मेस्त्री ; थंड हवेच्या ठिकाणांवर पर्यटकांना घाम फोडणारा उष्मा जाणवत आहे. त्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ऐन तेजीच्या दिवसांत पर्यटन व्यवसाय 30 ते 40 टक्क्यांनी मंदावल्याची शक्यता व्यक्त होत आहे. विशेषतः, कुटुंब पर्यटकांचा ओघ ओसरला आहे, असे दिसून येते.

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, रायगड जिल्ह्यातील माथेरान व इतर थंड हवेच्या ठिकाणांवर मेच्या हंगामी सुट्टीमध्ये पर्यटकांची रेलचेल असते. राज्यातील जवळपास 21 थंड हवेच्या ठिकाणी कमाल 35 ते किमान 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत आहे. त्यामुळे या धगधगत्या उष्णतेपासून बचाव व्हावा म्हणून पर्यटक येथे येण्यास पाठ फिरवत आहेत.

गेल्या दहा-बारा दिवसांपासून तापमानाचा पारा चढताच आहे. कोकण विभागात काही ठिकाणी तर उष्म्याचा इशारा देण्यात आला. त्यामुळे कोकणातील रायगडचे माथेरान, सिंधुदुर्गमधील आंबोली, पालघरमधील मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेले जव्हार, लगतच असलेले मोखाडा तालुक्यातील सूर्यमाळ अशी प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणे उंच प्रदेशात असल्याने तेथे अतिउष्णता जाणवत आहे.

थंड हवेच्या ठिकाणांसह समुद्री पर्यटनालाही उष्णतेच्या झळा बसत असून, सुट्ट्या पडल्यानंतरही तेथील पर्यटन व्यवसाय अपेक्षेप्रमाणे नाही, असे पर्यटन व्यावसायिक सांगत आहेत. थंड हवेच्या ठिकाणांसह समुद्रकिनार्‍यावर कमालीचे तापमान असल्यामुळे या तापमानात पर्यटक वर्ग किनार्‍यांवर कमी प्रमाणात येत असून, रिसॉर्टकडे मोठ्या प्रमाणात वळत असताना दिसत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्टीत रिसॉर्टसह कृषी पर्यटन, निसर्ग पर्यटन अशा ठिकाणी पर्यटक पसंती दर्शवत आहेत.

राज्यातील थंड हवेच्या ठिकाणी तापमान सरासरी 29 ते 30 अंशापर्यंत असते. मात्र, यंदा यामध्ये पाच ते सात अंशांनी वाढ झाली आहे. पर्यटक अपेक्षेप्रमाणे येत नसल्यामुळे या ठिकाणी असलेल्या पर्यटन व्यवसायाशी निगडित असलेल्या साखळ्या कोलमडत आहेत.

सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटक जात असले, तरी सोयीसुविधांयुक्त हॉटेल्समध्ये वातानुकूलित रूम्स बूक करत आहेत. त्यामुळे विना वातानुकूलित रूम्स असलेल्या हॉटेल्सला घरघर लागण्याची चिन्हे आहेत. ठिकाणे पाहण्यासाठी पर्यटक संध्याकाळची वेळ निवडत आहेत. संध्याकाळी हवी तशी स्थळे पाहायला मिळत नसल्याने त्यांचा हिरमोड होत आहे.

सध्या महाराष्ट्रात झालेली तापमानवाढ ही हवामान प्रणालीचा (वेदर सिस्टीम) परिणाम आहे.
– एस. जी. कांबळे, हवामान शास्त्रज्ञ व वेधशाळाप्रमुख, कुलाबा, वेधशाळा

हेही वाचा 

पहा व्हिडिओ – पुढील 3 दिवस महाराष्ट्रासह 7 राज्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा

Back to top button