अखेरच्या क्षणी पाच जागा दिल्याने शिंदे गटाची अग्निपरीक्षा; भाजपने राज्यात जागावाटपाची रणनीती बदलली | पुढारी

अखेरच्या क्षणी पाच जागा दिल्याने शिंदे गटाची अग्निपरीक्षा; भाजपने राज्यात जागावाटपाची रणनीती बदलली

मुंबई : नरेश कदम : राज्यातील लोकसभेच्या 35 हून अधिक जागा लढविण्याची रचलेली रणनीती जागावाटपाच्या महायुतीच्या गोंधळात भाजपने अखेरच्या क्षणी बदलली. आधी दहा जागाही मुख्यमंत्री शिंदे गटाला देण्यास नकार देणार्‍या भाजपने शेवटच्या क्षणी पाच अधिक जागा देऊन शिंदे गटाचीच अग्नीपरीक्षा घेण्याची रणनीती आखली आहे.
त्यामुळे आता शिंदे यांच्या नेतृत्वाची कसोटी लागेल. धनुष्यबाण चिन्हाचा फायदा कसा होतो, हे भाजप या निवडणुकीत बघणार आहे. शिवसेना शिंदे गटाची उपयुक्तता जोखण्याची व गेल्यावेळेस जिंकलेल्या जागा यावेळेस शिंदे गटाला राखता येतात की नाही हे तपासण्याची संधी भाजपला या निमित्ताने लाभणार आहे. या निकालावर शिंदे यांचे राजकीय भविष्य ठरणार आहे.

धाराशिवची जागा शिंदे गटाला हवी होती पण…

दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत झालेल्या बैठकीत 90 टक्के जागांचे वाटप अंतिम झाले असल्याचा दावा भाजपच्या नेत्यांनी केला होता. परंतु प्रत्यक्षात 24 हून अधिक जागांवर भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात दावे प्रतिदावे होत असल्याने महायुतीतील हा वाद चिघळत गेला. भाजप आणि अजित पवार गटात अंतर्गत ताळमेळ होता. पण त्यातही नाशिकचे विद्यमान खासदार शिंदे गटाचा असताना त्यावर सुरुवातीला भाजपने दावा केला तर त्यानंतर अजित पवार गटाला नाशिकची जागा द्या, असा आग्रह भाजपने शिंदे यांच्याकडे केला. धाराशिव ही जागा शिंदे गटाला हवी होती पण ही जागा अजित पवार गटाला दिली गेली.

अखेरच्या क्षणी भाजपच्या अधिक जागा

भाजप आणि शिंदे यांच्यात जागावाटपाबाबत अनेक शाब्दिक चकमकी झडल्या. ठाणे, नाशिक, दक्षिण मुंबई, पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग अशा जागांवर भाजप आणि शिंदे यांच्यात बरीच तणातणी झाली. त्यामुळे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने डोक्यावर हात मारून घेतला. शेवटी पालघर, रत्नागिरी सिंधुदुर्ग वगळता दक्षिण मुंबई, ठाणे, नाशिक यासह लोकसभेच्या 15 जागांची जबाबदारी शिंदे गटावर टाकण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या एक दोन दिवस आधीपर्यंत काही जागांवर घोळ सुरू होता. त्यामुळे अखेरच्या क्षणी भाजपने अधिक जागा देवून शिंदे यांच्या शिरावर ही जबाबदारी टाकली आहे.

रामटेक, वाशिम यवतमाळ, हिंगोली, संभाजीनगर, नाशिक, ठाणे, पालघर, दक्षिण मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम, रत्नागिरी सिंधुदुर्ग आदी जागांवरील वाद खूप दिवस सुरू राहिला. त्यामुळे कोणती जागा कोण जागा लढविणार हे शिंदे गट आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी कळत नव्हते. तर आघाडीचे उमेदवार केव्हाच जाहीर झाले होते. त्यामुळे भाजपच्या अनेक नेत्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. आता अखेरच्या क्षणी उमेदवार जाहीर करूनही शिंदे गट काही जागांवर कशी कामगिरी करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिवसेना (शिंदे) गटाच्या 15 जागा व उमेदवार

बुलढाणा (प्रतापराव जाधव), रामटेक (राजू पारवे), यवतमाळ-वाशीम (राजश्री पाटील), हिंगोली (बाबुराव कदम कोहळीकर), छत्रपती संभाजीनगर (संदीपान भुमरे), नाशिक (हेमंत गोडसे), कल्याण (श्रीकांत शिंदे), ठाणे (नरेश म्हस्के), मुंबई उत्तर पश्चिम (रवींद्र वायकर), मुंबई दक्षिण मध्य (राहुल शेवाळे), मुंबई दक्षिण (यामिनी जाधव), मावळ (श्रीरंग बारणे), शिर्डी (सदाशिव लोखंडे), कोल्हापूर (संजय मंडलिक), हातकणंगले (धैर्यशील माने)

हेही वाचा 

पहा व्हिडिओ- ‘महाशक्ती’ जागा वाटपाचा प्रश्न मार्गी लावणार? 

Back to top button