रांचीमध्ये ईडीचे आणखी पाच ठिकाणी छापे; दीड कोटी जप्त | पुढारी

रांचीमध्ये ईडीचे आणखी पाच ठिकाणी छापे; दीड कोटी जप्त

पुढारी ऑनलाईन डेस्क : रांचीमध्ये ईडीने आज (दि.७) आणखी पाच ठिकाणी छापे टाकले. राजीव कुमार सिंग या कंत्राटदाराकडून दीड कोटी जप्त करण्यात आले आहेत. वीरेंद्र राम प्रकरणाच्या संदर्भात ईडीने सोमवारी रांचीमधील अनेक ठिकाणी छापे टाकले.

झारखंडमध्‍ये सक्‍तवसुली संचालनालयाने (ईडी) ३५ कोटींची रोकड जप्‍त केल्‍या प्रकरणी आज ( दि. ७) झारखंडमधील झारखंडचे ग्रामीण विकास मंत्री आणि काँग्रेस नेते आलमगीर आलम यांच्‍या पीएसह त्‍यांच्‍या नोकराला अटक केली आहे. ईडीने सोमवारी (दि. ६) आलम यांचे स्‍वीय सहायक (पीए) संजीव लाल आणि त्‍याचा घरगुती नोकर जहांगीर आलम यांच्‍याकडून ३५ कोटी रुपयांची रोकड जप्‍त केली होती. मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदीनुसार ही कारवाई करण्‍यात आली आहे.

आतापर्यंत 35 कोटी रुपयांची रोकड जप्त

राज्याच्या ग्रामीण विकास विभागातील कथित अनियमिततेच्या संदर्भात ‘ईडी’ने रांचीमधील एका फ्लॅटवर छापा टाकला. हा फ्लॅट मंत्री आलम यांचे पीए संजीव लाल यांचा नोकर जहांगीर आलम याचा आहे. ईडीने या फ्लॅटमधून 32 कोटी रुपये जप्त केले. इतर ठिकाणी छापे टाकून तीन कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 35 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. दरम्‍यान, मंत्री आलम यांनी याप्रकरणी आपला कोणत्‍याही प्रकारचा संबंध नसल्‍याचा दावा केला आहे.

छापेमारीत रिअल इस्टेटची कागदपत्रेही जप्त

ईडीने सोमवारी संजीव लाल आणि त्याचा नोकर जहांगीर आलम, बिल्डर मुन्ना सिंग आणि त्याच्या जवळच्या लोकांच्या नऊ ठिकाणांवर छापे टाकले. या छाप्यात मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली असून, मोजणीसाठी पाच नोटा मोजण्याचे यंत्र आणि बँक कर्मचारी तैनात करण्यात आले होते. छापेमारीत ईडीने रिअल इस्टेटची कागदपत्रेही जप्त केली आहेत.

दरम्यान, ईडीने झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के. राम यांना फेब्रुवारी 2023 मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक केली आहे.

हेही वाचा 

Back to top button