नाशिक : मान्यतेअभावी रखडले जि. प. चे नियोजन | पुढारी

नाशिक : मान्यतेअभावी रखडले जि. प. चे नियोजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच विभागांनी या वर्षात प्राप्त झालेल्या नियतव्ययाप्रमाणे विकासकामांंच्या याद्या तयार करून त्या प्रशासकांकडे प्रस्तावित केल्या आहेत. त्या याद्यांसोबत आमदार, खासदारांनी सुचवलेल्या कामांच्या याद्याही जोडल्या आहेत. मात्र, या नियोजनावर निर्णय घेण्यासाठी जुलै उजाडणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हा परिषदेच्या मार्चअखेरची देयके देण्याचे काम एप्रिलमध्येच उजाडल्यानंतर प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सर्व विभागांना त्यांचा ताळमेळ पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. जिल्हा परिषदेत प्रथमच त्या वर्षी प्राप्त झालेल्या नियतव्ययातून त्याच वर्षातील कामांचे मे-जूनमध्ये नियोजन करण्याची संधी प्रशासनाला प्राप्त झाली होती. प्रत्यक्षात नियोजन तयार करण्यास विभागांना जूनचाही अर्धा महिना लागला. आता सर्व विभागांचे नियोजन पूर्ण होऊन त्यांनी कामांच्या याद्या निवडीसाठी मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडे प्रस्तावित केल्या आहेत. तसेच जिल्ह्यातील आमदार व खासदारांनी सुचवलेल्या कामांच्या याद्याही सोबत दिल्या आहेत.

जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधींची कारकीर्द असते, तेव्हा विषय समित्या कामांची निवड करतात व त्याप्रमाणे प्रशासन अंमलबजावणी करते. त्यावेळी विषय समित्यांनी कामे नियमाप्रमाणे सुचवलेली आहे किंवा नाही याचा पडताळणी प्रशासन करीत असते. आता प्रशासकांच्या कारकीर्दीत कामांची निवड करणे, त्या यादीला मान्यता देणे या दोन्ही बाबी प्रशासनाला करायच्या आहेत. त्यातच जिल्हा परिषद सदस्यांनी तुम्ही चुकीचे काम सुचवले आहे, दुसरे सुचवा, असे म्हणणे सोपे आहे. मात्र आमदार, खासदारांना सांगणे अवघड आहे. यामुळे या लोकप्रतिनिधींकडून आलेल्या यादीतील सर्व कामांची निवड कशी करायची व नंतर निवडून आलेल्या सदस्यांनी यात चुका काढल्या तर त्याची जबाबदारी आपल्यावर राहील, याची प्रशासनाला धास्ती वाटत असल्याचे दिसत आहे. यामुळे विभागांनी यादी देऊनही नियोजन अंतिम होत नसल्याचे चित्र आहे.

जलसंधारणला फटका
जलसंधारण विभागाने महिन्यापूर्वी नियोजन करून कामांची यादी मान्यतेसाठी प्रस्तावित केली आहे. मात्र, इतर विभागांचे नियोजन झाले नाही, या कारणामुळे त्यांच्या कामांना अद्याप मान्यता देण्यात आली नाही. महिन्यापूर्वी मान्यता दिली असती, तर आतापर्यंत कार्यारंभ आदेश देऊन कामेही सुरू झाली असती व जुलैपूर्वी कामे पूर्ण होऊन बंधार्‍यांमध्ये पाणीही साठू शकले असते, असे बोलले जात आहे.

हेही वाचा :

Back to top button