राऊत काही काम करणार नाही; मी निवडून आलो तर मंत्री होणार : नारायण राणे | पुढारी

राऊत काही काम करणार नाही; मी निवडून आलो तर मंत्री होणार : नारायण राणे

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : सिंधुदुर्गातील नागरीकांमुळेच मला अनेक पदे मिळाली. विरोधी पक्षाचे दहा वर्ष खासदार आहेत ते कोणतेही विकासकाम सांगत नाहीत फक्त राणे कुटुंबियांवर टीका करतात. विनायक राऊत निवडून आले तर काही करू शकणार नाही. केंद्रात व राज्यात सत्ता आमची येणार असल्याने मी निवडून आलो तर मंत्री होणार आहे. त्यामुळे शिवसेनेचे दुकान कायमचे बंद करून तरूण पिढीचे भविष्य बदलायचे असेल तर कमळ निशाणीला मतदान करा. कासार्डे विभागात विकास कामे आम्ही करत असल्याने येथून एकही मत विरोधकांना जाता कामा नये, असे आवाहन रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नारायण राणे यांनी केले. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलदे येथे आयोजित कासार्डे जिल्हा परिषद विभागाच्या निर्धार सभेत ते बोलत होते.

यावेळी आमदार नितेश राणे, भाजपा उपाध्यक्ष सुरेश सावंत, भाजपा तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, माजी जि.प. सदस्य संजय देसाई, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर, भाजपा महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, महिला जिल्हा सरचिटणीस पूजा जाधव, माजी  सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, ओटव सरपंच रुहिता तांबे, कासार्डे सरपंच निशा नकाशे, दारूम सरपंच तेजस्विनी लिंगायत, तोंडवली-बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच गुरूनाथ आचरेकर यांच्यासह भाजप पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी राणे म्हणाले की, भारतीय जनता पक्ष काम करताना जात-पात धर्म पाहत नाही तर माणूसकी पाहतो. आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. मोठे उद्योग आणायचे आहेत. दोडामार्ग प्रमाणे कुडाळ, कणकवली, वैभववाडी येथे जागा मिळाली तर पाचशे पेक्षा अधिक कारखाने आणणार. त्याचबरोबर रूग्णालयातील साहित्य बनवणारे कारखाने दोडामार्ग येथे आणत आहोत. तसेच फळप्रक्रिया उद्योग आणण्याबरोबर प्रशिक्षण केंद्र ओरोसला व  टेक्निकल सेंटर उभारून आधुनिक मशनरी कशा चालवायच्या याचे शिक्षण दिले जाईल. शिक्षण घेतल्यावर दोडामार्ग येथे कारखान्यात नोक-या मिळतील. सध्याच्या खासदाराने विमानतळाला विरोध केला आणि उद्घाटनाला, स्वागत करायला हेच होते. सीवर्ल्डला पर्यावरणाला धोका होईल यासाठी यांनीच विरोध केला. ज्या प्रकल्पात पैसे मिळत नाहीत त्याठिकाणी हे विरोध करतात. रत्‍नागिरी जिल्ह्यात हायवेच्या कामात ठेकेदारकडे किती कोटी मागितले हे त्यांना विचारा. पैसे दिले नाही म्हणून काम रखडले आहे. जैतापूर व नाणार प्रकल्पाला विरोध करणारे उमेदवार पाहीजे का, असे सांगत येथे तरूण-तरूणींना नोक-या मिळत नाहीत तर शिक्षण घेतल्यानतंर मुंबई, पुणे येथे मिळेल त्या पगारात नोकरी करतात. उध्दव ठाकरे यांनी जिल्ह्यात कोणता प्रकल्प आणून रोजणार दिला? असा सवाल करत फक्त भाषणे करून नरेंद्र मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतात असे ते म्हणाले.

यावेळी आमदार नितेश राणे म्हणाले, कासार्डे जिल्हा परिषद मतदारसंघ हा आमचा हक्काचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून ९० टक्के मतदान कमळ निशाणीला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विकासनिधी देताना आम्ही कमी पडत नाही मग मते मागतानाही हक्काने मागणार. विकासनिधी देताना मी भाजपला झालेल्या मतदानाच्या आकडेवारीनुसार ए, बी, सी, कॅटेगरी ठरवणार. त्यानुसार विकासनिधी देणार. त्यामुळे सरपंचांनी आता ठरवावे की आपणास किती विकासनिधी हवा आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी रविराज मोरजकर, भाग्यलक्ष्मी साटम, हर्षदा वाळके, प्रकाश पारकर, संजय देसाई, रज्जाक बटवाले, संतोष कानडे, सुरेश सावंत, पंढरी वायंगणकर आणि सरपंच यांनी मनोगते व्यक्त केली. ठाकरे गटाच्या असलदे ग्रा.पं.सदस्या सुवर्णा दळवी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संतोष जाधव यांनी केसे तर आभार मिलिंद मेस्त्री यांनी मानले.

हेही वाचा : 

Back to top button