लोअर परेल पुलाच्या गर्डरसाठी आजपासून पाच दिवसांचा ब्लॉक | पुढारी

लोअर परेल पुलाच्या गर्डरसाठी आजपासून पाच दिवसांचा ब्लॉक

मुंबई : पुढारी वृत्तसेवा :  लोअर परेल रेल्वे स्थानकाबाहेरील डिलाईल रोड उड्डाणपुलाचा गर्डर टाकण्यासाठी पश्चिम रेल्वेने पाच दिवसांचा ब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी रात्री 1.25 ते सोमवारी पहाटे 4.55 वाजेपर्यंत पुलाचा गर्डर टाकण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील पाच दिवस हा ब्लॉक राहणार आहे.

या ब्लॉकदरम्यान लोकलच्या वाहतुकीत बदल केले आहेत. हा उड्डाणपूल धोकादायक असल्याने 24 जुलै 2018 पासून वाहन आणि प्रवाशांसाठी बंद केला. फेब्रुवारी 2019मध्ये रेल्वे हद्दीवरील या पुलाचा भाग तोडण्यात आला. रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलावर मार्च 2021 पर्यंत गर्डर बसविण्याचे काम केले जाणार होते. परंतु अद्याप एकही गर्डर बसविण्यात आलेला नाही.

रेल्वे हद्दीतील उड्डाणपुलावर मे महिन्याच्या अखेरीस गर्डर बसविण्यात येणार होता. परंतु त्यास विलंब झाला. या ब्लॉकदरम्यान विरार- चर्चगेट लोकल रद्द केली आहे. त्याऐवजी विरार स्थानकातून रात्री 12.05ची चर्चगेटकरिता स्पेशल जलद लोकल धावणार आहे. ही लोकल बोरिवली,अंधेरी, बांद्रा,दादर आणि मुंबई सेंट्रल स्थानकांत थांबणार आहे. चर्चगेट ते विरार पहाटे 4.15 ची लोकल चर्चगेट ते दादरदरम्यान रद्द करून दादर ते विरार, तर चर्चगेट ते बोरिवली पहाटे 4.38 ची लोकल चर्चगेट ते बांद्रादरम्यान रद्द करून बांद्रा ते बोरिवली अशी धावेल. पहाटे 4.19 ची चर्चगेट ते  बोरिवली, पहाटे 5.31ची बोरिवली- चर्चगेट लोकल रद्द केली आहे. विरार ते चर्चगेट,

बोरिवली ते चर्चगेट, भाईंदर ते चर्चगेट या गाड्यांच्या वेळात बदल केला आहे. या गाड्या अनुक्रमे पहाटे 3.35 वा., प.4.11 वा. आणि प .4.10 वाजता सुटणार आहेत. तसेच चर्चगेट-विरार ही पहाटे 4.40ची लोकल मुंबई सेंट्रल स्थानकात 5 मिनिटे थांबविण्यात येणार आहे.

Back to top button