नाशिक : गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध होणार | पुढारी

नाशिक : गट-गण रचनेचा प्रारूप आराखडा आज प्रसिद्ध होणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महापालिकापाठोपाठ जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रक्रियेनेही वेग घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या ८४ गटांचे आणि १५ पंचायत समित्यांच्या १६८ गणांच्या प्रभाग रचनेच्या प्रारूप आराखड्यास विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मान्यता दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर झालेला हा प्रारूप आराखडा गुरुवारी (दि.२) प्रसिद्ध होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाने ४ मे रोजी राज्य निवडणूक आयोगाला दोन आठवड्यांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने फेब्रुवारी २०२२ मध्ये राबवलेला गट-गण प्रारूप आराखडा कार्यक्रम रद्द करत, जिल्हा परिषद व पंचायत समिती गट व गण प्रारूप रचनांचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला. यात आता गट-गणांचे प्रारूप आराखडे मान्यतेचे अधिकारी विभागीय आयुक्तांना दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने प्रारूप गट, गण रचना तयार करून प्रारूप आराखडा जिल्हा प्रशासनाकडून वेळेत सादर न होता २५ मे रोजी सादर झाला. या आराखड्यांची २६ ते ३१ मे दरम्यान पडताळणी झाली असून, काही तांत्रिक दुरुस्त्या करत विभागीय आयुक्तांनी या प्रारूप आराखड्यास मान्यता दिली आहे. मान्यता दिलेला आराखडा जिल्हाधिकारी यांच्याकडे ३१ मे रोजी उशिराने दाखल झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडून गुरुवारी (दि.२) हा प्रारूप आराखडा नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्ध केला जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासह तालुकास्तरावर तहसील कचेरी, पंचायत समितीस्तरावरदेखील आराखडा लावण्यात येणार आहे.

हेही वाचा:

Back to top button