नाशिक : जिल्हा परिषदेत “नियमित’ बदल्यांवर फुली; “आपसी’ बदल्या जोरात | पुढारी

नाशिक : जिल्हा परिषदेत "नियमित' बदल्यांवर फुली; "आपसी' बदल्या जोरात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

रिक्त पदांची संख्या अधिक असणे, पेसा क्षेत्राचे प्रमाणही अधिक असणे यामुळे जिल्हा परिषदेने नियमित बदल्या केल्या नसल्या तरी ३१ मे रोजी ५४ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या केल्या आहेत. या बदल्यांमुळे नियमित बदल्यांच्या वेळी कर्मचाऱ्यांसाठी पुरेसे पर्याय उपलब्ध राहत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये या आपसी बदल्यांबाबत नाराजी आहे.

जिल्हा परिषदेत दरवर्षी मेमध्ये नियमित बदल्या केल्या जातात. मात्र, कोरोना महामारीमुळे २०२० व २०२१ मध्ये बदल्या होऊ शकल्या नाहीत. या वर्षी ग्रामविकास विभागाने बदल्यांची प्रक्रिया राबवण्याचे निर्देश दिल्यानंतर जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागाने सेवाज्येष्ठता याद्या तयार केल्या. मात्र, नियमित बदल्यांची प्रक्रिया राबवल्यास पेसा क्षेत्रातील पदे शंभर टक्के भरावी लागतील. परिणामी, सामान्य क्षेत्रातील रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढून दैनंदिन कामकाजावर त्याचा परिणाम होईल. यामुळे जिल्हा परिषदेने यावर्षीही बदल्यांची प्रक्रिया राबवली नाही. यामुळे जिल्हा परिषदेचे कर्मचारी पाच-सहा वर्षांपासून एकाच ठिकाणी काम करीत असून, त्यांची बदली प्रक्रिया राबवावी, अशी तीव्र इच्छा आहे. सर्व विभागप्रमुखांनी प्रशासनाच्या सोयीसाठी बदल्यांची प्रक्रिया थांबवली असली तरी त्यांनी एकाच ठिकाणी पाच वर्षे सेवा केलेल्या ५४ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या केल्या आहेत. हे बदल केलेले कर्मचारी पुढील वर्षी बदलीसाठी पात्र असणार नाहीत.

काही कर्मचा-यांमधून अन्याय झाल्याची भावना – या कर्मचाऱ्यांना आता सोयीची ठिकाणे मिळाली असून, पुढील वर्षी समुपदेशन पद्धतीने बदली होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर हा अन्याय असल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे. आपसी बदल्या केलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये साधारणपणे ग्रामपंचायत विभागाचे ३०, आरोग्य विभागाचे चार, पशुसंवर्धन विभागाचे चार, सामान्य प्रशासन विभागाचे आठ आदी ५४ कर्मचाऱ्यांच्या आपसी बदल्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button