औरंगाबाद : १० महिन्यांपूर्वी सरणावरून परतलेल्या जिजाबाई गाेरे यांनी घेतला अखेरचा श्वास | पुढारी

औरंगाबाद : १० महिन्यांपूर्वी सरणावरून परतलेल्या जिजाबाई गाेरे यांनी घेतला अखेरचा श्वास

कन्नड (औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील अंधानेर येथील  वृद्धेस दि. २ ऑगस्ट, २०२१ रोजी मृत घोषित केल्यानंतर त्यांच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी झाली. स्मशानभूमीत नेल्यानंतर सरणावर ठेवून अंत्यविधी सुरू असताना त्यांनी अचानक डोळे उघडले. हा प्रकार पाहून नागरिक अवाक् झाले. त्यानंतर दहा महिन्‍यांनी जिजाबाई गोरे यांनी आज मंगळवारी (दि.३१) अखेरचा श्‍वास घेतला.

अंधानेर येथील जिजाबाई गोरे (वय ७५)  यांना . २ ऑगस्ट, २०२१ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास गावातील एका खासगी डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले होते. सर्व नातेवाईकांना निधन वार्ता देण्यात आली. गावापासून स्मशानभूमीचे अंतर अर्धा किलोमीटर असल्याने कन्नड शहरातून स्वर्गरथ मागविण्यात आला होता.

अंत्यसंस्कारापूर्वीच्या सर्व क्रिया पार पडल्यानंतर रात्री नऊ वाजता अंत्ययात्रा स्मशानभूमीत पोहोचली. मृत महिलेस सरणावर ठेवून चारही बाजूंनी रॉकेलचा शिडकावा करण्यात आला. अखेरचे पाणी पाजण्याची क्रिया सुरू असताना सदर महिलेच्या डोळ्यांवर पाणी पडले. त्यामुळे त्यांनी डोळ्यांची उघडझाप केली. हा प्रकार तेथे अंधारामुळे हातात बॅटरी धरून उभ्या असलेल्या इसमाच्या नजरेस पडला. त्याने तत्काळ पुढील कार्यक्रम थांबवून जिजाबाईंच्या अंगावर रचलेली लाकड़े बाजूला केली. त्यामुळे त्या उठून बसल्या अन् हे चित्र पाहून एकच खळबळ उडाली हाेती.

नातेवाइकांची रड़ारड थांबून सर्वांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. त्यांना तत्काळ सरणावरून खाली उतरवून शहरातील डॉ. मनोज राठोड यांच्या दवाखान्यात नातेवाइकांनी नेले. त्या जिवंत असून हृदयक्रिया सुरू आहे; मात्र ब्रेनडेड झाल्याने त्या कोमात गेल्याचे डॉक्टरनी सांगितले. त्यानंतर हळूहळू त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली. मुले, सुना व नातवंडांनी योग्य काळजी घेतल्याने तब्बल दहा महिने त्या जगल्या. मात्र आज दि. ३१ मे रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

दहा महिन्यांपूर्वीचा अनुभव बघता त्याची तपासणी करण्याकरिता शहरातील प्रसिद्ध डॉ. सीताराम जाधव, डॉ. सदाशिव पाटील यांना बोलावण्यात आले. त्यांनी तपासणी केली. त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

वैद्यकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी सर्व तपासणी करून तीन तासांनंतर सदर वृध्देस मृत घोषित केले. त्यानंतर रात्री गावातील स्मशानभूमीत जिजाबाई गोरे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्या माजी नगरसेवक विलास गोरे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्‍चात चार मुलगे, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे.

हेही वाचा: 

Back to top button