तणाव निर्माण करणार्‍यांचे भोंगे उत्तर कोल्हापुरात उतरवले : खा. संजय राऊत | पुढारी

तणाव निर्माण करणार्‍यांचे भोंगे उत्तर कोल्हापुरात उतरवले : खा. संजय राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात दंगली घडवण्याचे कारस्थान सुरू आहे. दंगलींच्या आडून राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा कट रचला जात आहे, असा घणाघाती आरोप शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला. हनुमान चालीसावरून राज्यात तणाव निर्माण करणार्‍यांचे भोंगे उत्तर कोल्हापूर मतदारसंघातील जनतेने खाली उतरवले, असा टोला त्यांनी विरोधी भाजप व मनसेला लगावला.

सांगली : ‘पुढारी’ अ‍ॅग्री पंढरी पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

नाशिक दौर्‍यावर असलेल्या खा. राऊत यांनी शनिवारी (दि. 16) पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यात मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या उपस्थितीतील हनुमान चालीसा पठणाचा समाचार राऊत यांनी घेतला. भाड्याने हिंदुत्व घेणार्‍यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. सर्वप्रथम 1987 साली विलेपार्ले पोटनिवडणुकीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्द्यावर निवडणूक जिंकली. आज काहीजण त्याची कॉपी करत असल्याचा टीकाही त्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली.

आगामी काळात निवडणुका असलेल्या राज्यांत धर्म व हिंदुत्वाच्या नावाखाली सामाजिक स्थैर्य बिघडवले जात आहे. रामनवमीला 10 राज्यांत झालेल्या दंगली हे त्याचेच उदाहरण आहे, अशा शब्दांत राऊत यांनी भाजपवर टीकास्त्र डागले. उत्तर प्रदेश निवडणुकीत हिजाबचा मुद्दा पुढे आणत तेथील निवडणुका जिंकल्या. महाराष्ट्रात मात्र सत्ता स्थापन करता येत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेले हिंदू एमआयएमच्या माध्यमातून तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी हनुमान चालीसा व भोंग्यासारखे प्रश्न पुढे आणण्यात आले. पण, जनता सुज्ञ असून, ते अशा हिंदू ओवेसींना थारा देणार नाहीत, अशा शब्दांत राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर तोफ डागली.
देशभरातील न्यायव्यवस्था एका विचारसरणीवर काम करत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत प्रकरणी दिलासा मिळाला, यावरून ते पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

हे उच्च न्यायालय नव्हे, तर दिलासा न्यायालय असल्याची टीका राऊत यांनी केली. माजी गृहमंत्री अनिल देशमुख व ना. नवाब मलिक यांच्यावर सूडबुद्धीने कारवाईचा उच्चार करतानाच भाडोत्री गुंडाकरवी माझीही बोलती बंद करायचा प्रयत्न सुरू आहे. पण, कितीही तोंड दाबायचा प्रयत्न केला, तरी मी बोलणारच, असे राऊत म्हणाले. लोक कशात पैसे खातील, याचा नेम नाही, असे सांगत 100 कोटींच्या टॉयलेट घोटाळ्याप्रकरणी सोमय्या यांना देशमुख व मलिक यांच्या शेजारच्या कोठडीत जावे लागेल, असा इशारा राऊत यांनी दिला. दरम्यान, मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठणासाठी वेळ मागणार्‍या खा. नवनीत राणा यांना दिल्लीत पुरेसा वेळ मिळतो, अशा शब्दांत राऊत यांनी त्यांचा समाचार घेतला. यावेळी सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, उपनेते सुनील बागूल, अजय बोरस्ते, माजी आमदार वसंत गिते यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

हनुमान चालीसा नव्हे, मारुती स्तोत्राचे पठण
पत्रकार परिषदेत ‘भीमरूपी महारूद्रा वज्र हनुमान मारुती’चे पठण करताना संजय राऊत अडखळले. पण, पुढच्याच क्षणी स्वत:ला सावरत, ‘पुढे काय रे…’ असा प्रश्न त्यांनी शिवसैनिकांना केला. यावेळी पत्रकारांनी आपण हनुमान चालीसा नव्हे, तर मारुती स्तोत्राचे पठण केल्याचे राऊत यांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर प्रभू श्रीराम व हनुमान सदैव पाठीशी असल्याचे कोल्हापूरच्या निकालातून स्पष्ट झाल्याचे सांगत त्यांनी वेळ मारून नेली.

रामराज्यासाठी
अयोध्येत संकल्प
अयोध्या हे आमचे घर आहे. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे हे अयोध्येचा दौरा करतील. या दौर्‍याचे सर्व नियोजन नाशिक शिवसेना करेल तसेच महाराष्ट्रात रामराज्य आणण्यासाठी अयोध्येत शरयूकाठी संकल्प केला जाईल, अशी माहिती राऊत यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button