सिंहायन आत्मचरित्र : हिमालयावर झेंडा | पुढारी

सिंहायन आत्मचरित्र : हिमालयावर झेंडा

डॉ. प्रतापसिंह ऊर्फ बाळासाहेब ग. जाधव मुख्य संपादक, दैनिक पुढारी

पाच नोव्हेंबर 2020 रोजी ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी पंचाहत्तर वर्षे पूर्ण केली. तसेच त्यांनी ‘पुढारी’ची सूत्रे 1969 साली हाती घेतली. त्यांच्या पत्रकारितेलाही 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. ‘पुढारी’ हे विविध चळवळींचे प्रथमपासूनचे व्यासपीठ. साहजिकच, संयुक्त महाराष्ट्र लढ्यापासून अनेक राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक घटनांचे ते साक्षीदार आहेत. केवळ साक्षीदार नव्हे, तर सीमाप्रश्नासह अनेक आंदोलनांत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे. पाऊण शतकाचा हा प्रवास; त्यात कितीतरी आव्हाने, नाट्यमय घडामोडी, संघर्षाचे प्रसंग! हे सारे त्यांनी शब्दबद्ध केले आहेत, ते या आत्मचरित्रात. या आत्मचरित्रातील काही निवडक प्रकरणे ‘बहार’मध्ये क्रमशः प्रसिद्ध करण्यात येत आहेत. – संपादक, बहार पुरवणी

मीही यावेळी हिंदीमधूनच माझ्या भावना व्यक्त केल्या,

“आप तो जानते हैं, देश का आम नागरिक लड़ाई में हिस्सा नहीं ले सकता। लेकिन देश के लिए जान हथेली पर लेकर लड़नेवालें वीर फौजी भाईयों की सहायता करने की भावना जरूर रखता है। देशवासियों की इसी भावना को हमने जान लिया और यही भावना सही समय पर जगाने का काम किया। इस नेक काम के लिये, ‘चैरिटी बिगिन्स अ‍ॅट होम’ इस कहावत के जरिये ‘पुढारी’ने सबसे पहले अपना योगदान दे दिया और इसके बाद ही आम लोगों को निधि देने के लिए अपील की।”

“आप यकीन नही मानेंगे, हमने अपील क्या की, लोंगो से सहायता की मानो बरसात ही शुरू हो गयी। देखते ही देखते हजारों हाथ मदद के लिये आगे बढ़ गये। मामूली किसान से लेकर मजदूर और कारखानदारों तक समाज के विभिन्न अंगों से निधि के लिए हाथ बटॉये गये। इतना ही नही, बल्कि छोटे बच्चों ने जनम दिन की मिठाई के लिए मिला एक एक रुपिया भी इस निधि में डाल दिया। मेहनतकश मजदूर और महिलाओंने भी अपने पसीने की कमाई इस राशी में डाल दी। बुजुर्ग नेताओंने और स्वातंत्र्य सेनानियों ने भी अपनी पेन्शन की रकम इस निधि में डाल दी। इस शुभ काम के लिए सभी जाती, धर्म और पंथों के लोगोंने अपना अपना हाथ बँटाया है। अढाई करोड रुपियों की यह ढेर सारी धनराशि हमने लोगों से पाई पाई करके इकठ्ठा कर दी है।”

‘न इज्जत रे, न अजमत दे,
न सूरत दे, नसिरत दे।
बस, वतन के वास्ते,
या रब, मरने की मुहरत दे॥’

स्वामी विवेकानंदांचे बंधू भुवनेश्वरी यांचा हा शेर मी पेश करताच, टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करीत उपस्थितांनी दाद दिली.

सिंहायन आत्मचरित्र
सियाचीन हॉस्पिटलच्या दशकपूर्तीनिमित्त भारतीय लष्कराच्यावतीने झालेल्या कृतज्ञता समारंभात नॉर्दन कमांड चीफ लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांच्या हस्ते माझा गौरव करण्यात आला. त्यावेळी डावीकडून योगेश जाधव, श्रीमंत शाहू महाराज, लेफ्टनंट जनरल राजन बक्षी, मेजर जनरल पी. पी. वर्मा.

मी पुढे म्हणालो, “इस देश को अखंडित रखने का काम तो आप जैसे जवानोंनेही किया है। आप की वीरता, असाधारण त्याग और बलिदान से यह देश अबतक सुरक्षित रहा है। आपकी निष्ठा का कोई प्रतिद्वंदी होही नही सकता।”

अत्यंत नम्रपणानं जवानांच्या शौर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत मी माझ्या मनातील भावना व्यक्त करीत गेलो, “युद्धात केवळ शस्त्रानं विजय मिळत नाही; ज्यांचं मन आणि मनगट दोन्हीही बळकट असतात त्यांनाच विजयश्री वरमाला घालीत असते. केवळ शस्त्रांवर नव्हे, तर जवानांच्या अंतःकरणातील देशप्रेमाच्या ज्वलंत भावनेवर विजय प्राप्त होत असतो.

मनामध्ये कुर्बानीची भावना घेऊन युद्धात सर्वस्व पणाला लावणार्‍या जवानांची महान परंपरा आपल्या देशाला लाभलेली आहे आणि हीच आमची खरी ताकद आहे. भारतीय जवानांनी आपल्या बलिदानानं या देशाचा गौरवशाली इतिहास लिहिलेला आहे. तो हिमालयापेक्षाही अधिक उंच आहे. भारतीय जवान ही आमच्या देशाची शान आहे!”

“सियाचीनमध्ये बांधण्यात आलेल्या हॉस्पिटलमुळे पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला आणि खासकरून कोल्हापूरच्या जनतेला अत्यानंद झाला आहे. देशाच्या सेवेत फूल ना फुलाची पाकळी समर्पित करताना आम्हाला अत्यानंद होत आहे. कारण अंतःकरणात ‘सरफरोशी’ची, प्रसंगी बलिदानाची उदात्त भावना घेऊन आमचे जवान लढत असतात. ही आमच्या देशाची तेजस्वी परंपरा आहे.”

‘जो किनारे से टकराता है, उसे कहते है तुफान।
जो तुफान से टकराता है, उसे कहते है जवान॥’

सिंहायन आत्मचरित्र
सियाचीन हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलेले माझे तैलचित्र.

या माझ्या उद्गारावर उपस्थितांचा उत्स्फूर्त, जोरदार प्रतिसाद मिळाला. टाळ्यांच्या कडकडाटातच मी पुढे बोलू लागलो, “जनतेच्या आणि ‘पुढारी’च्या वतीनं या ठिकाणी एक चिरंतन स्मारक होत आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. पण अहंकार अजिबात नाही. कारण ‘हम यहाँ दाता की अहंता लेकर नही आये है, बल्कि सेना के प्रति कृतज्ञता जताने, मथ्था टेकने आये हैं।”’ असे भावपूर्ण उद्गार मी काढले.

माझं भाषण जवानांना खूपच आवडलं. त्यापैकी अनेकांनी मला परस्पर भेटून धन्यवाद दिले. माझा ऊर भरून आला. संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनाही माझं भाषण खूप आवडलं. ‘आपल्याकडे लक्ष्मीबरोबरच सरस्वतीही नांदते आहे,’ अशी शाब्दिक सांगड घालूनच त्यांनी मी उभ्या केलेल्या निधीबरोबरच माझ्या भाषणाचंही तोंडभरून कौतुक केलं.

“आपल्या शब्दांत स्फुल्लिंग चेतवण्याची ताकद आहे. खूपच कमी लोकांमध्ये ही कला पाहायला मिळते. खरं तर आपण राजकारणात यायला हवं होतं. आपण समाजासाठी अधिक काही करू शकला असता.”
फर्नांडिस यांनी व्यक्त केलेली ही प्रांजळ भावना होती. त्यांनी केलेल्या कौतुकानं माझ्या अंगावर मूठभर मांस चढलं. कुणाच्या चढणार नाही?

जम्मू आणि काश्मीर राज्याचे कृषी राज्यमंत्री लेनशन नमग्याल, लडाखचे खासदार हुसेन खान हेही या समारंभाला उपस्थित होेते. जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला हे खरं तर या समारंभाला उपस्थित राहणार होते, परंतु ऐनवेळी पंतप्रधान वाजपेयींसमवेत त्यांना अमृतसरला एका कार्यक्रमासाठी जावं लागलं. मात्र, त्यांनी नमग्याल यांना राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून, तर हुसेन यांना नॅशनल कॉन्फरन्सचे प्रतिनिधी म्हणून आवर्जून पाठवून दिलं होतं. या दोघांनीही, ‘पुढारी’नं या दुर्गम परिसरात दिलेल्या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. विशेष म्हणजे या राष्ट्रीय कार्यक्रमाचं विविध वाहिन्यांवरून प्रसारणही करण्यात आलं.

परतापूरमध्ये उभं राहिलेलं हे हॉस्पिटल हा सियाचीनच्या विस्तीर्ण हिमवाळवंटात प्राणांची बाजी लावणार्‍या जवानांपासून ते या परिसरातल्या सामान्य नागरिकांपर्यंत सर्वांसाठीच एक कौतुकाचा विषय झाल्याचं दिसत होतं. या हॉस्पिटलच्या उभारणीमुळे तेथील वैद्यकीय अधिकारीही खूश झाल्याचं दिसून येत होतं.
“आता आम्हाला अनेकांचे जीव वाचवता येतील!” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

करवीरनगरीत मान्यवर पाहुण्यांचं जसं फेटा बांधून स्वागत करतात, तसं या नुंब्रा व्हॅलीत श्वेतवस्त्र मानाचं मानलं जातं. तेथील नागरिकांनी मला आणि फर्नांडिस यांना पारंपरिक पद्धतीनं श्वेतवस्त्र देऊन आम्हाला सन्मानित केलं.

अत्यंत दुर्गम भागात उभ्या केलेल्या या हॉस्पिटलमुळे ‘पुढारी’विषयी जवानांमध्ये विलक्षण कुतूहल होतं. ‘पुढारी’नं जमा केलेल्या निधीतील पै न् पै योग्य मार्गानं खर्ची पडली असल्याची भावना यावेळी लष्करी अधिकार्‍यांनी व्यक्त केली. अन्य दैनिकांनीही कुठे कुठे मदतनिधी उभा केला होता. परंतु, ‘पुढारी’नं उभा केलेला निधी प्रचंड मोठा होता आणि तो सत्कारणीही लागला, यातच ‘पुढारी’चं वेगळंपण दिसून येतं, अशी भावना उपस्थितांमधून व्यक्त होत होती.

सियाचीनसारख्या दूरवरच्या आणि दुर्गम भागात अडीच कोटींचं हॉस्पिटल उभा करणारा ‘पुढारी’ हा एखादा मोठा उद्योग समूह असला पाहिजे, अशी त्या ठिकाणी लष्करी अधिकार्‍यांसह सर्वांचीच समजूत. पण ‘पुढारी’ हे समाजाशी आणि जनसामान्यांशी बांधिलकी जपणारं एक स्वतंत्र वृत्तपत्र आहे आणि त्यानं सर्वसामान्यांनीच उचललेल्या खारीच्या वाट्यातूनच हे अडीच कोटी रुपये जमा केलेले आहेत, हे ऐकून प्रत्येकालाच आश्चर्य वाटल्यावाचून राहिलं नाही.

तसेच, ‘पुढारी’ हे कोणत्या समूहाचं वृत्तपत्र आहे; असा अनेकांचा प्रश्न! समूहाचं किंवा कुठल्या साखळीतलं नसून, ‘पुढारी’ हे एक स्वतंत्र वृत्तपत्र आहे, हे कळल्यानंतर तरी लष्करी अधिकार्‍यांच्या आश्चर्याला पारावरच उरला नव्हता आणि मग असं आहे, तर ‘पुढारी’नं एवढा निधी कसा दिला; हा दुसरा प्रश्न. ‘पुढारी’नं आम जनतेला आवाहन केलं आणि त्या आवाहनाला प्रतिसाद मिळून अगदी रुपया-दोन रुपयांपासून लाखांपर्यंतच्या देणग्या आल्या. ‘पुढारी’वर लोकांच्या असणार्‍या अतूट विश्वासातून हा निधी उभा राहिला, याचं सर्वांनाच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटल्याशिवाय राहिलं नाही.

‘पुढारी’बद्दल जवानांना आणि लष्करी अधिकार्‍यांनाही आपुलकीचं भरतं आलं होतं. त्यामुळे ‘पुढारी’ परिवारातील सदस्यांचीही अत्यंत जिव्हाळ्यानं चौकशी होत होती आणि त्यांना व्ही. आय. पी. ट्रिटमेंट मिळत होती.

तिथे सांगली, सातारा आणि कोल्हापुरातील अनेक जवान आपलं कर्तव्य बजावत होते. ते सर्व जण अत्यंत आपुलकीनं मला आणि ‘पुढारी’ परिवारातील सदस्यांना येऊन भेटत होते. आपल्या घरच्या माणसांच्या निधीतून इथे हॉस्पिटल उभं राहिलं, याचा आनंद त्यांच्या चेहर्‍यावरून ओसंडून वाहत होता. आपल्या माणसांनी घडवलेल्या या अभूतपूर्व कार्यामुळे त्यांचा ऊर अभिमानानं भरून आला होता.

या हॉस्पिटलच्या निमित्तानं नागरिक आणि सेना यांच्यात एक नवा सद्भावनेचा पूल निर्माण झाल्याची उत्कट भावना लष्करी अधिकार्‍यांच्या मनात आली होती. मूळचा त्याच भागातला, परंतु सध्या मुंबईत स्थायिक झालेला आणि पुण्याच्या फिल्म इन्स्टिट्यूटमधून शिकून बाहेर पडलेला एक कलाकार. फाँग सू लढाखी. हा देखील हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित होता. त्यानं यावेळी उत्स्फूर्तपणे एक सद्भावना गीत सादर केलं,

‘आतंक से हम ना डरेंगे,
अफवाओं को ना सुनेंगे,
होगी दिलों मे सद्भावना’

त्यानं गायलेल्या गीताच्या शब्दाशब्दांमधून देशप्रेम आणि सद्भावना ओथंबून वाहत होती. फाँगनं हे गीत गाऊन जणू सद्भावनेचा पूलच बांधला.

यशवंतराव चव्हाण यांच्याकडे जेव्हा संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली, तेव्हा ‘हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला,’ असं त्या घटनेचं वर्णन करण्यात आलं होतं. आता ‘पुढारी’नं सियाचीन इथे हॉस्पिटल उभं केल्यानंतर ‘हिमालयातील जवानांच्या मदतीला सह्याद्री धावून आल्याची’ प्रतिक्रिया सर्व जवानांमधून उमटत होती.

हॉस्पिटल उद्घाटनाचा सोहळा आटोपल्यानंतर लेह येथे हवाई दलाच्या विमानांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं झाली. ती नक्कीच नेत्रदीपक होती. मग हवाई दलाच्या खास विमानातून आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. आमच्या विमानाचा कॅप्टनही हॉस्पिटल उभारणीच्या कामानं भावुक झाल्याचं लक्षात आलं. ‘ये तो बहुत बढ़िया काम है!’ हे त्याचे उद्गार होते. तिन्ही सेनादलाची भावनाच या उद्गारातून व्यक्त झाली, असे म्हणायला हरकत नाही.

आम्ही नवी दिल्लीला परत आलो. दुसर्‍या दिवशी संसदेच्या अधिवेशनाचा पहिला दिवस होता. मला जॉर्ज यांचा फोन आला. ते म्हणाले, “उद्या संसदेचं कामकाज काही फारसं होणार नाही. दिवंगतांना श्रद्धांजली वाहून सभागृह तहकूब होईल. तेव्हा उद्या दुपारी तुम्ही माझ्याकडे साऊथ ब्लॉकमधल्या कार्यालयात लंचला या.”

दुसर्‍या दिवशी मी लंचसाठी त्यांच्याकडे गेलो. त्यावेळी ते मला हसून म्हणाले, “तुमचा पराक्रम देशाच्या कानाकोपर्‍यात पोहोचला आणि लगेच त्याची प्रतिक्रियाही उमटली.”
“म्हणजे?” मी न कळून विचारलं.

त्यावर जॉर्ज म्हणाले, “‘पुढारी’नं पुढाकार घेऊन उभारलेल्या निधीतून लष्करी इस्पितळ उभारलं गेलं, हे जेव्हा सगळीकडे समजलं, तेव्हा अनेक बड्या उद्योगपतींनी आणि वृत्तपत्र समूहाच्या संचालकांनी माझ्याकडे विचारणा केली की, तुम्ही अशा प्रकारचा एखादा प्रकल्प आम्हाला का सुचवला नाही?”

इतकं बोलून माझी प्रतिक्रिया अजमावण्यासाठी फर्नांडिस थोडे थांबले आणि माझ्याकडे पाहत राहिले. मी काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यावर स्मित करून ते पुढे म्हणाले, “त्यावर मी त्यांना सांगून टाकलं. ही कल्पना आम्ही सुचवलेली नाही. ती ‘पुढारी’चे संपादक बाळासाहेब जाधव यांची आहे! त्यांचीच ही कल्पना असल्यामुळे ती मला अन्य कोणाला सांगता येणं शक्यच नव्हतं.”
ही माहिती मला देत असतानाही त्यांचे शब्द जणू कौतुकाच्या साखरपाकात भिजलेले होते.

यावरून प्रेरणा घेऊन यापुढे कदाचित अशा अनेक विधायक योजना बनतीलही; पण अशा प्रकारचा मानदंड पहिल्यांदा निर्माण करण्याचा मान मात्र ‘पुढारी’नं मिळवला, हे निर्विवाद सत्य आहे. ‘आम्हीही हॉस्पिटल उभं केलं असतं,’ असं जॉर्जना सांगणार्‍यामध्ये कोण होते? तर, उद्योग क्षेत्रातील आयकॉन धीरूभाई अंबानी आणि ‘टाइम्स’ ग्रुपचे जैन!

सियाचीनच्या रुग्णालयाचं काम पूर्ण झाल्यावर ‘सह्याद्री वाहिनी’वर माझी एक प्रदीर्घ मुलाखत झाली. त्यामध्ये ‘आपल्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण कोणता?’ असा प्रश्न मला विचारण्यात आला. तेव्हा या प्रश्नाच्या उत्तरादाखल मी म्हणालो होतो, “सियाचीन हॉस्पिटलच्या उभारणीचा क्षण! हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च आनंदाचा क्षण होय!”
हे उद्गार अगदी सार्थ असेच होते, आजही आहेत!

सियाचीनचं हॉस्पिटल सुरू झालं. जवान आणि नागरिकांनाही उपचाराचा लाभ मिळू लागला. ‘पुढारी’च्या योगदानाचं सार्थक झालं. याच पार्श्वभूमीवर, ‘पुढारी’कार ग. गो. जाधव व्याख्यानमालेसाठी लेफ्टनंट जनरल अर्जुन रे यांना कोल्हापुरात आमंत्रित करण्यात आलं. सियाचीन येथील हॉस्पिटलच्या सुविधांसाठी ‘पुढारी’नं आणखी 25 लाखांचा निधी जमा केला होता. तोही निधी रे यांच्याकडे सुपूर्द करायचा होता. 20 मे 2002 रोजी व्याख्यानमालेसाठी रे कोल्हापुरात आले. त्यावेळी सियाचीन हॉस्पिटलच्या उद्घाटनाला सहा-सात महिने झाले होते.

या उभारणीमध्ये रे यांचाही सिंहाचा वाटा होता. त्यामुळे सियाचीन हॉस्पिटल हा त्यांचा अत्यंत लाडका विषय. त्यावर बोलताना आपल्या व्याख्यानात ते मोठ्या आपुलकीनं म्हणाले, “सियाचीन हॉस्पिटलची ‘पुढारी’नं केलेली उभारणी हा राष्ट्रनिर्मितीच्या कार्यातील आदर्श आहे!” रे यांच्या या उद्गारातूनही कृतज्ञतेचे भाव ओतप्रोत भरले होते. ते माझ्याविषयी फारच आत्मीयतेनं बोलले.

“प्रतापसिंह जाधव यांनी ‘पुढारी’च्या माध्यमातून निधी जमा करून सियाचीन हॉस्पिटल उभा केलं. त्यांनी हा राष्ट्रीय कार्याचा वस्तुपाठच घालून दिला आहे. खरं तर हॉस्पिटल उभा करणं ही शासनाची जबाबदारी; पण ती प्रतापसिंहांनी पार पाडली. देश संकटात असताना ते धावून आले. आमच्या जवानांना आणि अधिकार्‍यांना सियाचीन हॉस्पिटलमध्ये जाण्याचा जेव्हा जेव्हा प्रसंग येतो, तेव्हा तेव्हा प्रतापसिंह जाधव यांची, ‘पुढारी’ची आणि कोल्हापूर परिसरातील जनतेची हमखास आठवण येते.”

“राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक कार्याचा मानदंड निर्माण केला. तोच वारसा ग. गो. जाधव यांनी पुढे चालवला. प्रतापसिंहांनी तर तो आणखी पुढे नेला. ग. गो. जाधव हे दहा पावलं चालले, तर प्रतापसिंह शंभर पावलं पुढे गेले आहेत!”

“सियाचीन हॉस्पिटलच्या उद्घाटनावेळीच आधुनिक यंत्रसामग्रीसाठी आणखी पंचवीस लाखांची गरज पडणार आहे. ते जमवून द्यावेत, अशी विनंती फर्नांडिस आणि रे यांनी मला केली होती आणि कोल्हापूरच्या विशाल दातृत्वावर भरवसा ठेवून, मी हा निधी जमवून द्यायची घोषणा तेव्हाच केली होती. कोल्हापूरच्या दानशूर जनतेनंही माझा शब्द खाली पडू दिला नाही. निधी जमा व्हायला काहीच अडचण आली नाही. माझी वचनपूर्ती झाली. कर्तव्यपूर्तीचं समाधान लाभलं!” असं मनोगत मी त्यावेळी व्यक्त केलं.

‘वक्ता दशसहस्रेशु, दाता भवति वा न वा’, या उक्तीचा उल्लेख करीत मी कोल्हापूरच्या दानशूर जनतेला शतशः धन्यवाद दिले.

राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांना मी पत्र पाठवून सियाचीनला भेट देण्याची विनंती केली. ती त्यांनी स्वीकारल्यानं मला खूप आनंद झाला. 2 एप्रिल 2004 रोजी राष्ट्रपतींनी या उत्तुंग रणभूमीला भेट दिली. सियाचीनला भेट देणारे ते पहिलेच राष्ट्रपती. स्वाभाविकच त्यांनी सियाचीन हॉस्पिटललाही भेट दिली. पाहणी केली.

उपचारासाठी दाखल झालेल्या जवानांची आणि अधिकार्‍यांची त्यांनी आस्थेवाईकपणे चौकशी केली. त्यावेळी हॉस्पिटलची उभारणी होऊन दीड वर्ष झालं होतं. विशेष म्हणजे वैद्यकीय सेवा उपलब्ध झाल्यामुळे त्या दीड वर्षात सियाचीनमध्ये एकाही जवानाचा मृत्यू झालेला नव्हता. ही माहिती मला फर्नांडिस यांनीच मोठ्या अभिमानानं सांगितली.

सन 2011 साल. सियाचीन हॉस्पिटलची दशकपूर्ती. या क्षणाचं औचित्य साधून सियाचीन हॉस्पिटलमध्ये माझ्या भव्य छायाचित्राचं अनावरण करण्याचा निर्णय तिथल्या लष्करी अधिकार्‍यांनी घेतला. माझ्या कार्याबद्दल लष्करामध्ये कमालीचा आदर. त्या भावनेतूनच हा निर्णय घेण्यात आलेला. एखाद्या लष्करी वास्तूमध्ये, लष्करी ठाण्यावर एका मुलकी व्यक्तीच्या छायाचित्राचं अनावरण करण्याचा लष्करी इतिहासातील हा दुर्मीळ प्रसंगच म्हणावा लागेल. 2 मे 2013 रोजी हा ऐतिहासिक सोहळा लष्करी थाटात पार पडला. माझ्या कार्याची लष्करानं दिलेली ही पोचपावतीच होती.

लेह येथे उत्तर विभागाचं लष्करी मुख्यालय आहे. तिथल्या 153 जनरल हॉस्पिटलच्या धन्वंतरी सभागृहात हा अनावरण सोहळा पार पडला. उत्तर विभाग सेनाप्रमुख लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनी कळ दाबून रिमोट कंट्रोलनं सियाचीन हॉस्पिटलमधल्या माझ्या भव्य छायाचित्राचं अनावरण केलं. त्यांच्या हस्ते माझा खास मानचिन्ह देऊन गौरवही करण्यात आला. त्यावेळी माझ्या सन्मानार्थ उपस्थित वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांनी आणि जवानांनी मला उभं राहून अभिवादन केलं.

माझा सन्मान करताना ले. ज. पारनाईक म्हणाले, “सियाचीन हॉस्पिटलची उभारणी करून डॉ. जाधव यांनी लष्करासाठी आपलं अमूल्य योगदान दिलेलं आहे. या हॉस्पिटलमुळे आतापर्यंत हजारो जवानांना जीवदान मिळालेलं आहे. देशभक्तीचा यापेक्षा मोठा आविष्कार असूच शकत नाही.

निःस्वार्थी सेवा, लष्करावरील निष्ठा, सामान्य जनतेबद्दल जिव्हाळा म्हणजे डॉ. जाधव! आपल्या देशात जाधव यांच्यासारखे लोक आहेत, याचा मला खूप खूप अभिमान वाटतो. ‘पुढारी’ला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे.” आपल्या भाषणात पुढे त्यांनी ‘लष्करावर प्रेम करणारं कोल्हापूर’ अशा शब्दांत कोल्हापूरचा गौरव केला.

तसेच लेफ्टनंट जनरल राजन बक्षी आणि मेजर जनरल पी. पी. वर्मा यांनीही माझ्या कार्याबद्दल मला मनापासून धन्यवाद दिले. या कार्यक्रमास कोल्हापूरचे छ. शाहू महाराज हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना, “प्रतापसिंह हे ‘पुढारी’च्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचं काम करीत आहेत,” अशा शब्दांत त्यांनी माझा सन्मान केला.

उद्घाटनाच्यावेळी जॉर्ज फर्नांडिस यांनी सांगितलं होतं, “आज मैं रक्षामंत्रि हूँ, कल रक्षामंत्रि रहूँगा या न रहूँगा। पर अस्पतालपर ‘पुढारी’ की ही निगरानी रहेगी।” याच भावनेतून आजतागायत ‘पुढारी’ या हॉस्पिटलसाठी मदत करीत आला आहे. हॉस्पिटल बांधल्यापासून ‘पुढारी’ सातत्यानं स्वखर्चातून म्हणजेच स्वतःच्या फंडातून सर्व सुविधा या हॉस्पिटलला पुरवीत आला आहे. त्यासाठी निधी गोळा केला जात नाही.

2013 मध्ये स्वित्झर्लंडहून कलर डॉप्लर मशिन आणि इलेक्ट्रॉनिक ब्लँकेटस् मागवून ती या रुग्णालयाला पुरविण्यात आली. ‘भविष्यातही हॉस्पिटलला कोणतीही मदत लागू दे, ती पूर्ण करण्यात ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’चे असंख्य वाचक मागे हटणार नाहीत,’ अशी ग्वाही मी यावेळी दिली.

त्याप्रमाणे सियाचीन हॉस्पिटल व ‘पुढारी’ व्यवस्थापन यांचा दररोज संपर्क असतो. 2001 साली हॉस्पिटल बांधले आणि उद्घाटन करून लष्कराच्या ताब्यात दिले असले तरी हॉस्पिटल बांधल्यापासून ते आतापर्यंत हॉस्पिटलला लागणार्‍या सर्व गोष्टी ‘पुढारी’ व्यवस्थापन पुरवत असते. ‘पुढारी’च्या सीएसआर फंडातून सर्व ती मदत हॉस्पिटलला पुरवली जाते.

माझं भव्य छायाचित्र सियाचीन हॉस्पिटलमध्ये लावण्यात आलं. या भव्य छायाचित्राच्या वरील बाजूस ‘सियाचीन हस्पतालके जनक’ असं म्हटलं असून, खालील बाजूस ‘पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, ‘पुढारी’ पब्लिकेशन्स प्रा. लि. के चेअरमन एवम् मुख्य संपादक’, असं ठळक अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे. लेह येथील लष्कराच्या मुख्यालयात ‘हॉल ऑफ फेम’ येथेही सियाचीन हॉस्पिटलचं आणि माझं छायाचित्र लावण्यात आलेलं आहे.

या सोहळ्यासाठी आलेल्या मान्यवरांचं पारंपरिक लडाखी पद्धतीनं स्वागत करण्यात आलं. पारंपरिक लडाखी वेशभूषा केलेल्या युवती आणि धर्मगुरू यावेळी उपस्थित होते. लडाखी वाद्यांच्या अखंड गजरानं वातावरण मंत्रमुग्ध झालं होतं.
हा सोहळा वास्तविक बुधवारी सियाचीन हॉस्पिटलमध्येच होणार होता. परंतु, दुर्दैवानं काही दिवसांपासून सियाचीन भागात हिमवर्षाव सुरू झाला होता. त्यामुळे सियाचीनकडे जाणारे सर्व रस्ते व हवाईमार्ग बंद करण्यात आले होते.

तसेच सीमेवरचा तणावही थोडा वाढला होता. त्याच पार्श्वभूमीवर हा सोहळा लेहमधील लष्करी मुख्यालयात घेण्यात आला. या दिमाखदार सोहळ्यात माझ्या छायाचित्रांचं अनावरण पार पडल्यानंतर सियाचीन हॉस्पिटलवर खास तयार करण्यात आलेली चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली. ती पाहून सर्व जण मंत्रमुग्ध झाले.

या सोहळ्याला छ. शाहू महाराज यांच्यासह ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव, डॉ. अभय शिर्के आणि डॉ. दिलीप पठाडे हेही उपस्थित होते. या सर्वांचाही यावेळी हृद्य सत्कार करण्यात आला.

सियाचीन येथे ‘पुढारी’च्या फंडातून बांधण्यात आलेल्या या हॉस्पिटलबाबत आजही कोल्हापूरकरांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. ते पाहण्यासाठी येथून दरवर्षी अनेक नागरिकांचे ग्रुप सियाचीनला जातात. त्यामध्ये डॉक्टर्स, यंग ब्रिगेडर्स यांच्याबरोबरच ज्येष्ठांची संख्याही मोठी असते, हे विशेष. काही उत्साही तरुण तर मोटारसायकलवरूनही तिकडे जातात. अर्थातच त्यांच्यासोबत ‘पुढारी’चं पत्र असतं. तिथं भेट देणार्‍या नागरिकांच्या राहण्याची आणि भोजनाची व्यवस्थाही केली जाते. तेथील लष्करी अधिकार्‍यांना आणि जवानांना कोल्हापूरकरांबद्दल मोठा अभिमान आहे.

रे यांच्याप्रमाणेच ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव व्याख्यानमालेसाठी शिवाजी विद्यापीठानं जनरल ऑफिसर कमांडर इन चीफ नॉर्दन कमांड लेफ्टनंट जनरल के. टी. पारनाईक यांनाही पाचारण केलं. 20 मे 2012 रोजी त्यांचं व्याख्यान झालं. त्यांचा विषयच होता, ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि जम्मू काश्मीरमधील छुप्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर सियाचीन हॉस्पिटलचे महत्त्व!’ पारनाईक साहेबांचा हा आवडता विषय. जम्मू-काश्मीरमधील युद्धजन्य परिस्थिती त्यांनी जवळून अनुभवलेली. सियाचीन हॉस्पिटलची उभारणीही त्यांच्या समोरच झालेली. या हॉस्पिटलमध्ये गेल्या दहा-बारा वर्षांत लाखो जवानांवर आणि नागरिकांवरही यशस्वी उपचार झालेले.

त्यामुळे पारनाईक साहेबांचं व्याख्यान चांगलंच रंगलं. कारण त्यांच्याकडे सांगोवांगीचं काही नव्हतं. सारे बोल अनुभवाचे होते. एखादं व्याख्यान जेव्हा रंगतं, तेव्हा श्रोता वक्ता होऊन जातो आणि वक्ता वक्ता न राहाता स्वतःच एक व्याख्यान होऊन राहतो. असाच दिव्य साक्षात्कार पारनाईक साहेबांचं भाषण ऐकताना श्रोत्यांना झाला.

निःसंदिग्ध शब्दांत ते म्हणाले, “सियाचीन हॉस्पिटल उभारून ‘पुढारी’नं राष्ट्रीय कार्य केलं आहे. या हॉस्पिटलनं आजपर्यंत अनेक जखमी जवानांना जीवदान दिलेलं आहे. या हॉस्पिटलचा गौरव जवानांची संजीवनी म्हणून केला गेला आहे, तो सार्थच आहे. या संजीवनीमुळेच भारतीय जवानांचं मनोबल शतपटीनं वाढलेलं आहे.”

“पाकिस्तान हे राष्ट्र नाही, तर तो एक दहशतवादाचा अड्डाच आहे. छुप्या कारवाया करून दहशतवाद वाढवण्याचा पाकिस्तानचा डाव आहे. हा डाव हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर समर्थ आहे,” असा आत्मविश्वास पारनाईक यांनी व्यक्त केला. आपल्या भाषणात त्यांनी वारंवार सियाचीन हॉस्पिटलच्या उभारणीची प्रशंसा केली.

ते म्हणाले, “सेना दलाचा उत्तर विभाग म्हणजे आशिया खंडातील सर्वाधिक लक्षवेधी क्षेत्र! पाकिस्तान आणि चीन ही दोन्ही शत्रूराष्ट्रं एकाच सीमेवर. त्यामुळे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अशीच आमची तिथं अवस्था असते. शत्रूच्या हालचालीवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवावं लागतं. घुसखोरी हा तर पाकिस्तानचा एककलमी कार्यक्रम. छुपं युद्ध खेळण्यात पाकिस्तान पटाईत.

त्यामुळे त्यांच्याशी तर रोजच लढाई करावी लागते. त्यात निसर्गही पूर्णपणे प्रतिकूल. कधी कधी तर तो शत्रूला फितूर आहे की काय, अशी शंका येते. अशा या कठीण परिस्थितीत सियाचीन येथे हॉस्पिटल उभारून ‘पुढारी’नं सैन्य दलाचं मनोबल उंचावण्याचं काम केलेलं आहे. त्यांचे सैन्य दलावर थोर उपकार आहेत.”

पारनाईक यांच्या भाषणानं कोल्हापूरकर श्रोत्यांची मनं हेलावली आणि ऊर अभिमानानं भरून आला. माझ्या भाषणात, ‘सियाचीन हॉस्पिटल हे राष्ट्राभिमानाचं प्रतीक’ असल्याचं मी विशद केलं. यावेळी सियाचीन हॉस्पिटलच्या उभारणीबद्दल माझा नॉर्दन कमांडच्या वतीनं लेफ्टनंट जनरल पारनाईक यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला. एका ज्येष्ठ सेनानीनं सियाचीन हॉस्पिटलचा गौरव केल्यामुळे उपस्थित श्रोतासमुदाय सुखावून गेला.
वुई सॅल्यूट यू!

लेफ्टनंट जनरल अर्जुन रे यांनी 2001 च्या नोव्हेंबरमध्ये मला एक अगदी भावस्पर्शी पत्र लिहिलं होतं. मूळ इंग्रजीतील पत्र खालीलप्रमाणे,

Dear Balasaheb,
1. On behalf of all ranks of 14 corps. I offer you our deep gratitude, for providing the army and the people of Nubra a state of art hospital. This indeed one more milestone in your contribution to social justice and nation building. we salute you.
2. I also take apportunity to thank you for making an additional allocation of Rs. 25 lacs to the hospital as a corpus fund and an offer for medical equipment. We shall be writing to you shortly on this account.
with warm regards
yours sincerely
Arjun Ray
Lt. Gen. Arjun Ray, VSM
General Officer Commanding,
H. Q. 14 Corps.

हेच पत्र मराठीमध्ये :

प्रिय बाळासाहेब,

जवान आणि नुंब्रा येथील जनतेसाठी सुसज्ज असे हॉस्पिटल उभारून दिल्याबद्दल भारतीय सेना दलाच्या (उत्तर विभाग) चौदाव्या कोअरच्या अधिकारी आणि जवान यांच्या वतीने मी मनःपूर्वक कृतज्ञता व्यक्त करतो. सामाजिक न्याय आणि राष्ट्र उभारणीच्या कार्यातील आपल्या योगदानात हा आणखी एक मैलाचा दगड आहे. आम्ही आपल्याला सलाम करतो.

हॉस्पिटलसाठी आणखी 25 लाख रुपयांचा निधी देऊ केला आहे आणि वैद्यकीय उपकरणे पुरवण्याचे आपण मान्य केले आहे, त्याबद्दल मी आपला आभारी आहे. यासंदर्भात आम्ही आपल्याला लवकरच पत्राद्वारे कळवीत आहोत.
आपला स्नेहांकित,
ले. ज. अर्जुन रे (विशिष्ट सेवा पदक)

जनरल ऑफिसर कमांडिंग
मुख्यालय, 14 कोअर

हे पत्रच एवढं बोलकं आहे की, याच्यावर वेगळं भाष्य करण्याची गरजच नाही. भारतीय सेना दलानं एखाद्या मुलकी नागरिकाविषयी ‘सॅल्यूट’ करण्याची सर्वोच्च भावना दर्शवावी, हे उदाहरण दुर्मीळच म्हणावं लागेल. सियाचीन हॉस्पिटल उभारणीचं काम किती महान आणि किती उदात्त होतं, याची प्रचिती या एका पत्रावरून आल्याशिवाय राहत नाही.

देशभक्तीच्या उत्कट भावनेतून हे एक महत्त्वाचं कार्य मी हाती घेतलं होतं. त्याची यशस्वी पूर्तता झाली, याचं समाधान माझ्या मनाला, इतर कुठल्याही समाधानापेक्षा अधिक होतं आणि आजही आहे. विशेष म्हणजे हे कार्य केवळ भारतीय सीमांतच सीमित राहिलेलं नसून, त्याची जागतिक स्तरावरही नोंद घेण्यात आलेली आहे. प्रत्येक देशाची भौगोलिक परिस्थिती वेगवेगळी असते. त्या-त्या परिस्थितीनुसार सैनिकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असते. अशा देशांसाठीही सियाचीनमध्ये ‘पुढारी’नं केलेलं कार्य एक आदर्श ठरत असल्याचं संरक्षण खात्याबरोबरच केंद्रातील अनेक वरिष्ठ अधिकार्‍यांनी सांगितलं आहे.

‘पुढारी’च्या माध्यमातून केलेल्या या महान कार्याला वृत्तपत्रसृष्टीतच काय, अन्यत्रही तोड नाही. हे मत माझं स्वतःचं नसून दिल्लीतील ‘पांचजन्य’ या सुप्रसिद्ध साप्ताहिकाचं आहे. ‘पांचजन्य’नं या कार्याची प्राधान्यानं दखल घेतली. ‘पुढारी’चं हे कार्य म्हणजे राष्ट्रभक्त पत्रकारितेचा कीर्तिस्तंभ आहे, असा अभिप्राय ‘पांचजन्य’नं प्रसिद्ध केलेल्या आपल्या लेखात केलेला आहे. या कार्याची झळाळी पुढील पिढ्यांनाही प्रेरणादायी ठरेल, यात शंकाच नाही.

‘पुढारी’च्या या कार्याचा डंका सामान्य नागरिकांपासून ते देशातील सर्व जवान आणि लष्करी अधिकार्‍यांपर्यंत आणि केंद्रीय मंत्र्यांपर्यंत सर्वत्र दुमदुमला. हॉस्पिटल आपलंच समजून मी सातत्यानं मदतीचा हात देत राहिलो. गेल्या वीस वर्षांत सुमारे एक लाखांवर जवान, अधिकारी आणि नागरिकांवर या हॉस्पिटलमध्ये यशस्वी उपचार करण्यात आले.

हिमालयाच्या शिखरावर ‘पुढारी’चा आणि कोल्हापूरच्या जनतेचा झेंडा फडकला. सुमारे 260 वर्षांपूर्वी अटकेपार झेंडा फडकावताना मराठ्यांनी दुर्दम्य राष्ट्रभक्तीचं दर्शन घडवून इतिहास रचला होता. सियाचीन हॉस्पिटलच्या निर्मितीमधूनही तीच भावना जनमानसातून प्रकट झाली, तर त्यात आश्चर्य वाटायचं कारण नाही. जणू पुन्हा एकदा जरीपटका अटकेपार फडकला; असंच म्हणावं लागेल.

अर्थात, हे सर्व घडावं आणि ते माझ्या हातूनच घडावं, अशी नियतीचीच इच्छा असली पाहिजे. मी केवळ कारणमात्र आहे, याचीही मला जाणीव आहे. आपण समाजाचं काही देणं लागतो आणि ते देणं सव्याज परत केलं पाहिजे, याचं आत्मभान मला नेहमीच होतं आणि आजही आहे. सामाजिक बांधिलकीचा हा वसा-वारसा मी माझ्या पूर्वसुरींकडून घेतला. जे चांगलं ते घ्यावं, वाईट ते सोडावं ही माझी भूमिका. म्हणूनच ज्ञानपीठ विजेते कवी विंदा करंदीकर यांची ही कविता मला मनापासून भावते,

‘उसळलेल्या दर्याकडून
पिसाळलेली आयाळ घ्यावी
भरलेल्या भीमेकडून
तुकोबाची माळ घ्यावी
देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे
घेता घेता एक दिवस
देणार्‍याचे हात घ्यावे!’

याच सामाजिक बांधिलकीतून मी सारे काही देऊन टाकलं आहे. देता देता माझे हातही मी समाजाच्या स्वाधीन केलेले आहेत. सियाचीन हॉस्पिटल हे त्यापैकीच एक ठळक उदाहरण होय.

Back to top button