सांगली : ‘पुढारी’ अ‍ॅग्री पंढरी पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी | पुढारी

सांगली : ‘पुढारी’ अ‍ॅग्री पंढरी पाहण्यासाठी शेतकर्‍यांची गर्दी

सांगली : पुढारी वृत्तसेवा

दैनिक ‘पुढारी’ माध्यम समूह आणि जिल्हा कृषी विभागातर्फे आयोजित अ‍ॅग्री पंढरी या कृषी प्रदर्शनास शुक्रवारपासून सुरुवात झाली. शनिवारी हा ज्ञानयज्ञ पाहण्यासाठी शेतकर्‍यांनी मोठी गर्दी केली. पीक प्रात्यक्षिकांसह कृषिविषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा खजिना पाहून शेतकरी भारावून गेले. मंगळवार, दि. 19 पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे विजयनगर येथे सकाळी दहा ते रात्री आठवाजेपर्यंत हे प्रदर्शन सुरू आहे. प्रदर्शनाचे ऑरबीट गु्रप ऑफ कंपनीज् हे प्रायोजक आहेत. रॉनिक स्मार्ट ‘दि कुटे ग्रुप’ सहप्रायोजक, तर ‘केसरी टूर्स’ हे ट्रॅव्हल पार्टनर आहेत.
शुक्रवारी सहकार व कृषी राज्य मंत्री डॉ. विश्वजित कदम, आमदार सुधीर गाडगीळ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. ऑरबीट गु्रप ऑफ कंपनीज्चे चेअरमन दीपक राजमाने, उपविभागीय कृषी अधिकारी प्रकाश सूर्यवंशी, कुटे गु्रपचे सेल्स मॅनेजर सतीश पवार, केसरी टूर्सच्या संचालिका झेलम चौबळ, रॉनिक वॉटर हिटरचे तानाजी पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रदर्शन पाहण्यासाठी शेतकर्‍यांचा ओघ वाढत आहे. शनिवारी सकाळपासूनच शेतकर्‍यांची गर्दी झाली. प्रात्यक्षिकासाठी या ठिकाणी फुले, फळे, भाजीपाला परिपूर्ण तयार झाली आहेत. यामध्ये हिरवे वांगे, गवारी, स्वीटकॉर्न, काकडी, कलिंगड, पिवळी झुकेनी, ढबू मिरची, दोडका, घेवडा, बीन्स, कारले, मुळा, दुधीभोपळा, पावटा, झेंडू यासह 50 पेक्षा अधिक पिकांची लागवड केली आहे. या पिकांच्या प्रात्यक्षिकांची पाहणी शेतकरी बारकाईने करीत होते.

यानंतर ड्रोनद्वारे औषध फवारणीच्या प्रात्यक्षिकाचा आनंद शेतकरी लुटत होते. विविध कंपन्यांच्या स्टॉलना भेटी देऊन शेतकरी प्रत्येक तंत्रज्ञानाची माहिती घेत होते.

खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, बी-बियाणे, फवारणीची औषधे, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, पाईप लाईन, शेतीपंप, सोलर पंप, शेती विषयक पुस्तके, विविध शासकीय अनुदानाच्या योजना, मल्चिंग पेपर, शेततळे कागद, ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, ब्लोअर, रोप लावणी यंत्रे,
रोटारवेटर, पॉवर टिलर, ट्रॅक्टर, दूध काढणी यंत्र, कडबा कुट्टी, सेंद्रिय खते, बँका, पतसंस्थांचे स्टॉल
पाहताना शेतकर्‍यांना नवतंत्रज्ञान मिळाल्याचा आनंद चेहर्‍यावर दिसत होता.

आज हळद; उद्या ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन

प्रदर्शनात रविवार, दि. 17 रोजी 12.30 वाजता ‘हळद व आले : उत्पादनात वाढ व भविष्यातील संधी’ याविषयी जितेंद्र कदम हे मार्गदर्शन करणार आहेत. तर सोमवार, दि. 12.30 वाजता ‘एकरी 100 टन ऊस उत्पादनासाठी आधुनिक तंत्रज्ञान’ याविषयी डॉ. संजीव माने हे मार्गदर्शन करतील. याचा शेतकर्‍यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

Back to top button