नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून गांजा, गुटखा व दारूसह 3 कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त | पुढारी

नंदुरबार जिल्हा पोलिसांकडून गांजा, गुटखा व दारूसह 3 कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त

नंदुरबार – लोकसभा निवडणूक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलिसांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांच्या मुस्क्या आवळल्या असून आतापर्यंत केलेल्या कारवाईत गांजा गुटखा दारू सह 3 कोटीपेक्षा अधिकचा मुद्देमाल जप्त केला आहे. एकूण 4095 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई, एकूण 24 हद्दपार प्रस्ताव, 32 फरार आरोपी अटक अशी देखील कारवाई केली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक एस. श्रवणदत्त यांनी ही माहिती दिली.

याविषयी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचे काळात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने आजपावेतो एकुण 03 कोटी 08 लाखांहून अधिकचा मुद्देमाल विविध कारवाईत जप्त केला आहे. त्यात 94 लाख 11 हजार 855 रुपयांची अवैध दारु, 03 लाख 57 हजार 718 रुपये किमतींचा गांजा, तसेच प्रतिबंधीत असलेला एकुण 70 लाख 30 हजार 903 रुपये किमतीचा गुटखा, व त्यासाठी वापरण्यात येणारी वाहने असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

त्याचप्रमाणे जिल्हयातील आजपावेतो एकूण 4095 इसमांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच विविध गंभीर गुन्हयातील एकूण 24 सराईत गुन्हेगारांवर हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. जिल्हयातील तसेच जिल्हयाबाहेरील विविध गुन्हयातील पाहिजे/फरार आरोपी असलेल्या एकूण 32 आरोपींना अटक करण्यात यश मिळाले आहे. तसेच आजपावेतो जिल्हयातील 484 शस्त्र परवाना धारकांकडील शस्त्रे जमा करण्यात आली आहेत.

संपुर्ण जिल्हयात एकुण 26 आंतरराज्य आणि 08 आंतरजिल्हा तपासणी नाके/नाकाबंदी पॉइंट कार्यरत असुन या नाक्यांवरुन अवैध दारु, अंमली पदार्थ, बेहिशेबी रोकड, इत्यादी अशा अवैध बाबींची वाहतुक होणार नाही यासाठी सतर्कपणे तपासणी सुरू आहे. अवैध धंदयावर छापेमारी, कोम्बिंग ऑपरेशन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर नजर ठेवली जात असून, उशिरापर्यत हॉटेल्स, ढाबे, बार इ. आस्थापना सुरु राहणार नाहीत याची दक्षता घेतली जात आहे. बीट मार्शल, गस्ती पथके, भरारी पथके संपूर्ण जिल्हयात वेळोवेळी आपले कर्तव्य चोखपणे बजावित आहेत. तसेच निवडणूक प्रचारासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, प्रचारादरम्यान रहदारीस अडथळा निर्माण होवु नये, इ. सर्व बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.

त्याचप्रमाणे सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणा-यांवर सायबर सेल हे वेगवेगळया प्लॅटफार्मवर वेळोवेळी सतर्क असून समाजविघातक पोस्ट व्हायरल/शेअर करणा-यांवर विशेष लक्ष ठेवून आहेत. लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी जिल्हा पोलीस विभाग कटिबध्द असून संपुर्ण विभाग सुसज्ज आहे.

“लोकसभा निवडणुक काळात कुठल्याही आमिष व भितीला बळी न पडता, आपले मतदान करावे व आपले लोकशाही कर्तव्य बजवावे” नागरिकांना काही अडचण असल्यास किंवा काही असामाजिक तत्वांबद्दल व अवैध गतिविधींबद्दल माहिती असल्यास कृपया पोलीस विभागास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. श्रवण दत्त. एस यांनी केले आहे.”

हेही वाचा –

Back to top button