रत्नागिरी : यंदा 10 टक्केच आंबा मिळणार? | पुढारी

रत्नागिरी : यंदा 10 टक्केच आंबा मिळणार?

रत्नागिरी ; पुढारी वृत्तसेवा : वातावरणातील बदलांमुळे यंदा आंबा उत्पादन अवघे 10 टक्केच राहील, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गतवषींच्या तुलनेत आंबा पेट्यांची संख्याही घटली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत आंबा वाढेल, अशी शक्यता असताना त्यात मोठी घट होण्याची चिन्हे आहेत.

गेली 25 वर्षे आंबा बागायतदार अडचणीत येत आहे. यंदाही हंगामाच्या सुरुवातीपासून अवकाळी पाऊस, थंडीचा कडाका, ढगाळ वातावरण यामुळे आंबा पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढला होता. त्यापासून हापूसचे संरक्षण करण्यासाठी बागायतदाराला औषधांची फवारणी करावी लागली होती. मात्र, अद्यापही वातावरणात सातत्याने बदल होत आहे. ढगाळ वातावरण, अधूनमधून पडणारा अवकाळी पाऊस यामुळे आंब्यात घट होताना दिसत आहे. त्यामुळे अपेक्षित असलेले उत्पादन मिळताना दिसत नाही.

दरवर्षी गुढीपाडव्याला 80 हजार ते एक लाख पेटी बाजारपेठेमध्ये दाखल होते. परंतु, या वर्षी परिस्थिती बिकट असून अवघी वीस हजारापर्यंतच पेटी कोकणातून मार्केटमध्ये दाखल झाली. ढगाळ वातावरण, अवकाळी पाउस, उष्णतेमुळे आंबा गळतीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे झाडावरील आंबा 10 टक्के मिळेल, अशी शक्यता आहे.

अन्यथा रस्त्यावर उतरू

* तत्कालीन सरकारने कर्ज पुनर्गठनाचे आश्वासन आंबा बागायतदारांना दिले होते. मात्र त्याचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे 14 टक्के व्याजाने बँकांनी कर्ज वसुली केली. काहींना भविष्यात कर्जही मिळणार नाही, अशी स्थिती आहे. शेतकरी कर्जबाजारी झाला असून काहींच्या मालमत्ताही सीज झाल्या. काहींनी दागिने विकून हप्ते भरले. आता कोकणवासीयांचा संयम संपत आला असून रस्त्यावर उतरावे लागेल, असे कोकण हापूस आंबा उत्पादक संघटनेचे बावा साळवी यांनी सांगितले.

Back to top button