जळगाव : धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उघडले न्यायालय | पुढारी

जळगाव : धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री उघडले न्यायालय

जळगाव; पुढारी वृत्तसेवा:  पोलिसांनी जप्त केलेली गुरं गोशाळेतच राहू देण्यात यावी, या मागणीसाठी एका गोवंश प्रेमी नागरिकाने शनिवारी थेट धरणगाव न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. विशेष म्हणजे, या बाबतच्या सुनवाईसाठी धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री साडेदहा वाजेला न्यायालय उघडले.

सुनवाईनंतर न्यायालयाने गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.

त्यामुळे आता पुढील आदेश होईपर्यंत पोलिसांना गुरं गोशाळेतच राहू द्यावी लागणार आहेत. दरम्यान, धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय उघडल्यामुळे आज सगळीकडे याचीच चर्चा होती.

या संदर्भात अधिक असे की, धरणगाव शहरातसह पाळधी दूरक्षेत्र भागात बकरी ईद अनुषंगाने धरणगाव पोलीस स्टेशनतर्फे सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. या सर्च ऑपरेशनमध्ये धरणगाव शहरात कुरेशी मोहल्ला भागात २० आणि गुरे पारधी दूरक्षेत्र हद्दीत १४ असी एकूण ३४ गुरे मिळून आली होती.

सदर गुरांना कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून गोशाळेत ठेवण्यात आले होते. परंतू, थोड्या दिवसांनी यात राजकीय दबाव सुरु झाला. गोशाळेला याबाबत एक पत्र देत ही गुरं मूळ मालकांना परत देण्याच्या सूचना पोलिसांकडून करण्यात आल्या होत्या.

प्राण्यांच्या जीवितास धोका

त्यामुळे गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे यांनी याबाबत धरणगाव न्यायालयात अॅड. राहुल पारेख यांच्यामार्फत एक याचिका दाखल केली.
श्रीपाद पांडे यांनी याचिकेत गुरांना गोशाळेतच राहू देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती.

यानंतर अॅड. राहुल पारेख रात्री दहा वाजता न्यायालयात गेले आणि त्यांनी न्यायालयाला पटवून दिले की, जर तात्काळ सुनवाई न झाल्यास प्राण्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो.

न्या. एस. डी. सावरकर यांनी देखील परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत सुनवाई करत गुरांची परिस्थिती व जप्तीबाबत वस्तूनिष्ठ अहवाल न्यायालयाला सादर करण्याचे आदेश धरणगाव पोलिसांना दिले.

आता पुढील आदेश येईपर्यंत पोलिसांना गुरे गोशाळेतच राहू द्यावी लागणार आहेत. याबाबत पुढील सुनवाई आता २ ऑगस्ट रोजी होणार आहे.

न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अॅड. राहुल पारेख यांच्यासमोर पुन्हा एक समस्या उभी राहिली की, न्यायालयाने आदेश तर दिले आहेत. परंतू, आदेशाची प्रत नसल्यामुळे पोलीस प्रशासन पुढील कारवाई करून मोकळे होण्याची भीती होती.

त्यावर अॅड. पारेख यांना स्व:तच एक अर्ज लिहून त्यावर न्यायालयालाने या संबंधी कोणते आदेश दिलेत?, हे नमूद करण्याचे ठरविले.

त्यानुसार अॅड. पारेख यांनी तारीख आणि वेळ नमूद करत सेल्फ अटेस्टेड अर्ज तक्रारदार श्री. पांडे यांच्यामार्फत पोलिसांसमोर रात्री अकरा वाजता पाठविला. परंतु, रात्री पोलीस स्थानकात यावर मार्ग निघू शकला नाही.

शेवटी रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास श्री. पांडे आणि गावातील गोवंश प्रेमी नागरिकांनी पोलीस निरीक्षकांची भेट घेऊन न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती दिली.

विशेष म्हणजे, गोवंश प्रेमी श्रीपाद पांडे हे रात्रीपासून तर पहाटेपर्यंत पोलीस स्थानकात थांबून होते. दरम्यान, धरणगावच्या इतिहासात पहिल्यांदाच रात्री न्यायालय उघडल्यामुळे सगळीकडे याची जोरदार चर्चा सुरु आहे.

दुसरीकडे याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा व पकडण्यात आलेले २० गुरं कायमस्वरूपी संगोपनासाठी कामधेनू गो शाळेत ठेवावे, असे निवेदन नुकतेच भाजपाने धरणगाव पोलीसांना दिले.

हेही वाचलंत का? 

Back to top button