कृष्णा-माणगंगा जोडल्यास महापुराला आळा | पुढारी

कृष्णा-माणगंगा जोडल्यास महापुराला आळा

विटा : विजय लाळे

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या कृष्णा नदीच्या पाणलोटातील महापुरावर कृष्णा-माणगंगा नदी जोड प्रकल्प जालीम उपाय ठरणार आहे. हा नदी जोड प्रकल्प राज्य शासनाच्या महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ – पुणे यांच्या सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ, आरफळ कालवे विभाग, करवडी (कराड) यांनी तयार करून सकारात्मक शिफारशींसह जलसंपदा विभागाकडे पाठवला आहे. त्याला शासनाच्या अनेक उच्चस्तरीय अधिकार्‍यांकडून प्रतिसाद मिळाला आहे.

महाबळेश्वरच्या डोंगररांगांत दरवर्षी सरासरी 6 हजार 500 मि. मी. पाऊस पडतो. त्यामुळे अनेक वेळा कृष्णेला महापूर येतो. त्या पुराचा फटका सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कृष्णाकाठच्या अनेक गावांना बसतो. मात्र, त्याच वेळी माणगंगा, येरळा आणि अग्रणी नद्यांच्या खोर्‍यात दुष्काळी परिस्थिती असते.

केवळ पावसाळ्याच्या काळातील म्हणजे 30 जून ते 15 सप्टेंबरपर्यंतचे पाणी जरी दरवर्षी मिळाले, तरी तो भाग सुफलाम होईल. कृष्णा लवादाच्या वाटपाव्यतिरिक्त पावसाळ्यातील 4.52 टीएमसी पाणी कृष्णा नदीत उपलब्ध आहे. त्याशिवाय कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ वळण बंधारा बांधून ते पाणी धोम धरणात आणि तेथून उताराने थेट दुष्काळी भागाकडे आणण्यात येणार आहे.

असा आहे प्रकल्प आराखडा

कोयना धरणाच्या पाणलोटातील सोळशी नदीवर धनगरवाडी गावाजवळ एक वळण बंधारा बांधून 8.76 किलोमीटर लांबीचा पहिला बोगदा प्रस्तावित आहे. या बोगद्यातून धोम धरणाकडे (कृष्णा नदीवरच्या या धरणाची साठवण क्षमता 14 टीएमसी आहे) 94 घनमीटर प्रतिसेकंद विसर्गाने 3.50 टीएमसी पाणी येईल.

या धरणाची पूर्ण संचय पातळी 747.70 मीटर आहे. यातून 1979-1980 ते 2007-08, 2009-10 आणि 20015 ते 2021 पर्यंतच्या कालावधीत प्रत्यक्ष सांडव्यातून पाण्याचा विसर्ग लक्षात घेता सरासरी 4.52 टीएमसी पाणी योजना बाहेरचे उपलब्ध आहे. असे दोन्ही मिळून या प्रकल्पासाठी एकूण 8.02 टीएमसी पाणी उपलब्ध आहे.

सोळशी ते धोम धरणाच्या डाव्या काठापासून (उत्तरेकडून) ते दबई नाला (ता. आटपाडी, जि. सांगली) यादरम्यान 117 किलोमीटर लांबीचा दुसरा मुख्य बोगदा काढण्यात येणार आहे. त्या बोगद्याला धोमपासून 76 कि.मी.वर दरुज-वाकेश्वरजवळ पूर्वोत्तर दिशेला 15 कि.मी.वर असणार्‍या पिंगळी नदीला जोडणारा आणखी एक उपबोगदा काढण्यात येणार आहे.

ही पिंगळी नदी गोंदवले बुद्रुकजवळ माणगंगेला मिळते. ते अंतर साधारणत: 4.50 कि.मी. इतके आहे. त्यामुळे गोंदवले बुद्रुकपासून माणगंगेवरील सर्व मध्यम, लघुपाटबंधारे, तलाव आणि कोल्हापूर पद्धतीचे बंधारे यांना पाणी मिळेल. दुसर्‍या बाजूला धोमकडून येणार्‍या या मुख्य बोगद्यातून दबई नाल्यात येईल आणि या जवळच्या जांभुळणी नाल्यातून पुढे 4 किलोमीटरवर घाणंद संतुलन तलावात येईल. तेथून पुढे टेंभू योजनेच्या अस्तित्वात असलेल्या सर्व वितरण प्रणालीचा (म्हणजेच कालव्यांचा) वापर करून पाणी सर्वत्र देता येईल.

दुसरीकडे जांभुळणी तलावातून बाहेर पडलेले पाणी थेट आटपाडी तलावात जाईल. हा तलाव भरल्यानंतर पुढे शुक ओढ्यामार्गे आटपाडी शहराच्या पूर्वेस माणगंगा नदीला जाईल. पिंगळी नदीतून राजेवाडी तलावामार्गे आटपाडी तालुक्याच्या उत्तर भागातून फिरून एकत्रितपणे आलेले पाणी माणगंगेतून सोलापूर जिल्ह्याकडे जाईल.

दरम्यान, घाणंद तलावापासून निघालेला टेंभूचा कालवा (सांगोला शाखा) नेलकरंजी, मानेवाडी, हिवतड यामार्गे सांगोल्याकडे जात असताना चिंचाळे, खरसुंडी, कानकात्रेवाडी, माळे वस्ती, तळेवाडी या गावांतील ओढ्यातून त्या खालच्या करगणी, पात्रेवाडी, बनपुरी, कचरे वस्ती, शेटफळे आदी गावांना आणि परिसरातील सर्व लहान-मोठ्या तलावांना पाणी मिळेल आणि ते सर्व पाणी टेंभू योजनेच्या या शाखेला कवठेमहांकाळकडे जाणार्‍या बाणुरगड बोगद्यातून उताराने जाऊन सर्व ओढे, नाले व त्यावरील बंधारे, तलाव आपोआप भरतील. तसेच ज्या ज्या ठिकाणी पाणी साठवण योजना आहेत त्या पूर्ण क्षमतेने भरून उर्वरित पाणी खालच्या बाजूस माणगंगा नदीला मिळणार आहे.

येरळा ही कृष्णेची उपनदी असली तरी मुळात माणदेशातील आहे. या नदीच्या एकूण 100 कि.मी. लांबीपैकी या प्रकल्पातून वडूज ते ब्रह्मनाळ अशा 68 कि.मी.च्या पात्राला थेट पाणी देता येईल. धोममधूनच्या 117 कि.मी. लांबीच्या मुख्य बोगद्याला 85 कि.मी.वर फक्त 100 मीटर लांबीचा आणखी एक पोटबोगदा काढून वडूजजवळ लेंडूर ओढ्याजवळ पाणी येरळवाडी तलावात सोडले तर ते पुढे येरळेला जाते. त्यामुळे या नदीलाही मिळेल.

या बरोबरच अग्रणी या कृष्णेच्या आणखी एका उपनदीला ही प्रकल्पाद्वारे प्रवाहित करता येते. अग्रणी नदीची लांबी 75 कि.मी.इतकी आहे. ही नदी भूड (ता. खानापूर, जि. सांगली) गावाजवळील भिवघाटापासून उत्तरेला डोंगरात उगम पावते. धोममधून आणलेले पाणी जांभुळणी तलावातून टेंभू योजनेच्या, सध्या अस्तित्वात असलेल्या सर्व कालव्यांद्वारे पुढे नेलकरंजी (ता.आटपाडी) फाट्यापासून 5 कि.मी.चा बोगदा काढून वायफळेच्या अलीकडे यमगर वाडी रस्त्याजवळ (ता. तासगाव) अग्रणीला पाणी देता येईल.

या ठिकाणी पाणी 4 मीटरच्या नैसर्गिक उताराने नेलकरंजीहून बोगद्याद्वारे अग्रणीला मिळेल. ही नदी तासगाव, कवठेमहांकाळच्या पुढे कर्नाटकातील खिळेवाडी (जि. बेळगाव) च्या पलीकडे जाऊन कृष्णेला मिळते. अशा रीतीने माणगंगा, येरळा आणि अग्रणी या तिन्ही नद्यांना पाणी मिळणार आहे.

Back to top button