ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने निधन | पुढारी

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे यांचे वृद्धापकाळाने निधन

पुणे; पुढारी वृत्तसेवा: ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. प्र. ल. गावडे (वय ९७ ) यांचे रविवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले.

प्रा. डॉ. प्रभाकर लक्ष्मण गावडे यांचा जन्म नेवासे येथे  झाला. त्‍यांचे माध्यमिक शिक्षण ‘भाऊसाहेब फिरोदिया विद्यालय’ अहमदनगर तर महाविद्यालयीन शिक्षण ‘फर्गसन महाविद्यालय’ व ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालय’ पुणे येथे झाले.

पुणे विद्यापीठात मराठी व संस्कृत  विषयांमध्‍ये १९५२ मध्ये एम.ए. तर १९५६ मध्ये एम.एड झाले.

डॉ.  गावडे यांनी १९६८ मध्ये पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी संपादन केली. ‘सावरकर : एक चिकित्सक अभ्यास’ हा प्रबंध त्‍यांनी सादर केला हाेता.

या प्रबंधास उत्कृष्ट प्रबंधाबद्दल पुणे विद्यापीठातर्फे ‘न. चि. केळकर पारितोषिक’ व ‘परांजपे पारितोषिक’ (१९७०) मिळाले. या ग्रंथास (१९७१ – ७२) ला महाराष्ट्र राज्याचा पुरस्कारही मिळाला हाेता.

डॉ. प्र. ल. गावडे यांचे शैक्षणिक प्रशासन सेवेतील कार्यही प्रदीर्घ आणि मौल्यवान राहिले.

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीमध्ये उपकार्यवाह, तीन वर्षे कार्यवाह आणि सहा महिने सल्लागार म्हणून कार्य पाहिले. गावडे यांनी विपुल लेखन केले.

अधिक वाचा 

संतसाहित्य  संशोधनाचा विषय

‘कवी यशवंत – काव्यरसग्रहण’ व ‘सावरकरांचे साहित्यविचार’ ही स्वतंत्र पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. ‘अजिंक्यतारा’ या ना.ह.आपटे यांच्या कादंबरीचे संपादन त्यांनी केले. संतसाहित्य हा डॉ. प्र. ल. गावडे यांच्या संशोधनाचा चिंतनाचा विषय हाेता.

‘श्री तुकाराम गाथा’, ‘ज्ञानेश्‍वरी’, ‘श्री ज्ञानेश्‍वर वाङ्मय सूची’ व ‘श्रीनामदेवकृत श्री ज्ञानेश्‍वर समाधी अभंग’ या त्‍यांच्‍या संपादित पुस्तकांचे प्रकाशन ‘श्री ज्ञानेश्‍वरमहाराज संस्थान, आळंदी’ यांनी केले आहे.

‘संजीवन’ हा संपादित ग्रंथ श्री ज्ञानेश्‍वरमहाराज संजीवनसमाधी सप्तशताब्दीनिमित्ताने प्रकाशित झालेला आहे. ‘शारदीयेचे चंद्रकळे’ हे पुस्तक आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचे प्रकाशन आहे. प्राज्ञ पाठशाळा, वाई, ‘विश्‍वकोश’ ग्रंथलेखनात अभ्यागत संपादक म्हणून ते सहभागी झाले हाेते.

विविध  चर्चासत्रातील अभ्यासपूर्ण सहभागामुळे त्या- त्या चर्चासत्रांना एक वैचारिक उंची प्राप्त करून देण्याचे कार्य डॉ. प्र. ल. गावडे यांनी केले. मुख्याध्यापक प्रशिक्षण वर्गांचे संचालन त्यांनी ‘आदर्श बहुव्यापी शिक्षक व संशोधन महाविद्यालय’ पुणे या संयोजन संस्थेच्या माध्यमातून केले हाेते.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button