देवगड : मच्छीमारी सुरू; मात्र हवामान प्रतिकूल | पुढारी

देवगड : मच्छीमारी सुरू; मात्र हवामान प्रतिकूल

देवगड; पुढारी वृत्तसेवा : दोन महिन्यांच्या बंदी कालावधीनंतर खोल समुद्रातील मच्छीमारीला सुरुवात झाली; मात्र हवामान पोषक नसल्याने यांत्रिकी नौका सध्या देवगड बंदरातच उभ्या आहेत. कांडाळीद्वारे मच्छीमारी करण्यास सुरुवात झाली आहे.

खोल समुद्रातील मच्छीमारी बंदी कालावधी 1 जून ते 31 जुलैपर्यंत होता. 1 ऑगस्टपासून समुद्रातील मच्छीमारी सुरू झाली आहे; मात्र समुद्रातील वातावरण पोषक नसल्याने देवगडमधील नौकामालकांनी अद्याप किनार्‍यावर घेतलेल्या नौका पाण्यात लोटण्यास सुरुवात केली नसली, तरी कांडाळीद्वारे मच्छीमारी करणार्‍या छोट्या नौका लोटण्यास सुरुवात झाली आहे.

1 ऑगस्टपासून नव्या मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाल्याने किनारपट्टी भाग गजबजू लागला आहे. देवगड बंदरातील समुद्रातील वातावरण पोषक नसल्याने मोठ्या नौका समुद्रात मच्छीमारीसाठी जात नसल्या, तरी काही प्रमाणात छोट्या नौका मच्छिमारीसाठी जाऊ लागल्या असून कांडाळीद्वारे मच्छीमारी व्यवसाय सुरू झाला आहे.

मच्छीमारांना काही प्रमाणात बांगडा मासा मिळत असून मासळी विक्रेत्यांकडे 200 रुपयांना चार किंवा पाच नग असा बांगडा माशाचा दर होता. सुरमईचा दर चार नगांना 500 रुपये होता. मासळी मिळण्याचे प्रमाण कमी असल्याने दरही वधारले आहेत.

मच्छीमारी हंगामाला सुरुवात झाली, तरी वादळी वातावरण व खवळलेला समुद्र यामुळे मोठ्या नौकांना मच्छीमारी करण्यास अद्याप पोषक वातावरण नसल्याने मोठे ट्रॉलर्स किनार्‍यावर आहेत.

आठ ते दहा दिवसांनंतर ट्रॉलर्सही पाण्यात लोटण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होईल, अशी शक्यता मच्छिमार नेते भाई खोबरेकर यांनी व्यक्‍त केली.

हंगाम सुरू झाला, तरी यांत्रिकी नौकांद्वारेअद्याप मच्छीमारीला सुरुवात न झाल्याने लिलाव सेंटर अद्याप सुरू झाले नाहीत; मात्र बांगडा, सुरमई हे मासे बाजारात येऊ लागल्याने खवय्यांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

Back to top button