२०७० पर्यंत भारत दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे भाकीत | पुढारी

२०७० पर्यंत भारत दुसरी मोठी अर्थव्यवस्था होईल : परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांचे भाकीत

 नाशिक : पुढारी वृत्तसेवा- भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन जगाच्या पटलावर 10 वर्षांपूर्वी 10 व्या क्रमांकावर होते. आज पाचवा क्रमांक लागतो. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव पर्वात तृतीय स्थानावरून पुढे घोडदौड करीत २०७० पर्यंत भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाची माेठी अर्थव्यवस्था होईल. भारत पूर्वीही विश्वगुरू, विश्वबंधू होता आणि भविष्यातही राहील, असा विश्वास पराराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केला.

नाशिक बद्दल काय म्हणाले?

  • माझे आजोबा ‘एचएएल’चे चेअरमन असताना ओझरमध्ये एचएएल प्रकल्प आला असल्याचा संदर्भ त्यांनी दिला.
  • नाशिकनगरीत येऊन आनंद वाटल्याचे ते म्हणाले.

श्वास फाउंडेशन, नाशिक आयोजित ‘विश्वबंधू भारत’ कार्यक्रमांतर्गत मंत्री जयशंकर यांची गोखले एज्युकेशन सोसायटीच्या गुरुदक्षिणा हाॅलमध्ये गुरुवारी (दि. १६) प्रकट मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. व्यासपीठावर केंद्रिय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, आयोजक प्रदीप पेशकार उपस्थित होते. ज्येष्ठ विचारवंत विजय चौथईवाले, कोक्युयो कॅमलिनचे श्रीराम दांडेकर यांनी जयशंकर यांची मुलाखत घेतली.

विश्वबंधुत्वासाठी जगाशी संबंध, वसुधैव कुटुंबकम‌् ही भावना आणि त्यात भारत प्रथम या सर्वांचे एकत्रीकरण म्हणजे विश्वबंधू भारत, अशी संकल्पना जयशंकर यांनी प्रथम विशद केली. भारतावर दहशतवादाच्या माध्यमातून दबाव टाकून यशस्वी होऊ असे शेजारीला राष्ट्राला वाटते. उरी, कारगिल, बालाकोटमध्ये ते कसे पराभूत झाले, हे जगाने पाहिले, असे सांगून जयशंकर यांनी, हनुमान आणि श्रीकृष्ण हे पुराणातील सर्वांत मोठे राजदूत आहेत, असे मत मांडले. दहशतवाद नेस्तनाबूत करायचा असेल, तर न्यायतत्त्वाने, थेट आणि संतुलित धोरणे राबवावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. कॅनडाने भारतात दहशतवादास समर्थन देणाऱ्या शक्तींना आश्रय दिला आहे म्हणून उभय देशांतील संबंध ताणले गेल्याचेही त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी आमदार देवयानी फरांदे, डॉ. भरत केळकर, डॉ. विजय मालपाठक, सुहास वैद्य, दिलीप क्षीरसागर, संजय कुलकर्णी, संजय चंद्रात्रे, विक्रम थोरात उपस्थित होते.

पाकव्याप्त काश्मीर भारताचाच भाग

पाकव्याप्त काश्मीर हा भारतच आहे. तत्कालीन नेतृत्वाच्या चुकीमुळे हा भाग त्यांनी बळकावला. जमिनीच्या वादात एखाद्याने एखादा भाग बळावून काम सुरू केले, तरी कायद्याने ती जमीन त्यांच्या नावे होत नाही. कायद्याच्या अधिष्ठानावर पाक आणि चीन दोघेही कमजोर आहेत. त्यांच्या नावाने ती भूमी नाहीच, ती भारताचीच आहे. ३७० कलम काढल्यानंतर आता संपूर्ण ‘पीओपी’ भारतात येणार हे निश्चितच, असा ठाम विश्वास जयशंकर यांनी व्यक्त केला.

खरेदीचा दबाव तिथे १२८ देशांना लस निर्यात

दुहेरी नागरिकत्वाचा मुद्द्यावर बोलताना जयशंकर म्हणाले, यावर चर्चा, अभ्यास सुरू असून, त्याचा निर्णय होण्यासाठी काही काळ जावा लागेल. कोविड काळात भारतामध्ये महामारीने सर्वाधिक लोकांचा मृत्यू होईल, असा दावा करत कोविड लस आयात करण्यासाठी जगाचा दबाव होता. परंतु भारताने देशी बनावटीची लस विकसित करून १२८ देशांना लस निर्यात केली, ही बाब देशासाठी भूषणावह असल्याचे त्यांनी नमूद केले.

संयुक्त राष्ट्रसंघात सदस्यत्व?

७० वर्षांपूर्वी भारताला संयुक्त राष्ट्रसंघात कायमस्वरूपी सदस्यत्वासंबंधी हालचाली झाल्या होत्या. परंतु, तत्कालीन पंतप्रधानांनी भारताआधी चीनला संयुक्त राष्ट्रसंघात कायमस्वरूपी सदस्यता मिळावी, अशी भूमिका घेतली होती. यूएनच्या १९३ देशांमध्ये निवडणूक झाली, तर भारतास कायमस्वरूपी सदस्यत्वासाठी बहुमत मिळेल, अशी आशा परराष्ट्रमंत्र्यांनी व्यक्त केली.

हेही वाचा –

Back to top button