पुणे : हवालदाराने घेतली चक्क १ लाख १० हजारांची लाच | पुढारी

पुणे : हवालदाराने घेतली चक्क १ लाख १० हजारांची लाच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पोलीस हवालदाराने १ लाख १० हजारांची लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून या हवालदाराला रंगेहाथ पकडले.

दादासाहेब नामदेव ठोंबरे (वय ५०) असे या लाचखोर पोलीस हवालदाराचे नाव आहे.

मारामारीच्या गुन्ह्यात तक्रारदाराचे नाव न घेण्यासाठी ही लाच संबंधित हवालदाराने घेतल्‍याचे समाेर आले आहे.

बारामती तालुका पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दादासाहेब ठोंबरे याला अटक करण्यात आली आहे.

दादासाहेब ठोंबरे हा बारामती तालुका पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता.

या प्रकरणी एका २८ वर्षाच्या तरुणाने तक्रार दिली आहे.

मारहाणीच्या प्रकरणातून तक्रारदार तरुणाचे नाव कमी करण्यासाठी व त्याच्यावर गुन्हा दाखल न करण्यासाठी मदत करण्यासाठी दादासाहेब ठोंबरे याने १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितली.

या तरुणाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत या प्रकाराची माहिती दिली.

त्यांनी केलेल्या पडताळणीत ठोंबरे याने १ लाख १० हजार रुपये घेण्याचे मान्य केल्‍याचे समाेर आले.

पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, सुहास नाडगौडा यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे, पोलीस अंमलदार रतेश थरकार, अंकुश आंबेकर यांनी सापळा रचला.

तक्रारदार यांच्याकडून १ लाख १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना दादासाहेब ठोंबरे याला पाेलिसांनी रंगेहाथ पकडले.

पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

Back to top button