नाशिक : पुतण्यांची फसवणूक करणार्‍या काकाला कारावास | पुढारी

नाशिक : पुतण्यांची फसवणूक करणार्‍या काकाला कारावास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सहा अल्पवयीन पुतण्यांच्या नावे असलेल्या मुदत ठेवींवर पालनकर्ता म्हणून नाव असल्याचा गैरफायदा घेत काकाने मुदत ठेवीवर कर्ज काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी काकासह इतर संशयितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात न्यायालयाने मुलींचा काका रघुनाथ लक्ष्मण ताजनपुरे (67, रा. चेहडी) याला तीन वर्षांचा कारावास व प्रत्येक पुतणीला 50 हजार 600 रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.

हरिश्चंद्र ताजनपुरे यांनी 1995 रोजी त्यांच्या सहा अल्पवयीन मुलींच्या नावे देवळाली बँकेत प्रत्येकी 25 हजारांची मुदत ठेव ठेवली होती. त्यावेळी मुलींचे काका रघुनाथ ताजनपुरे याने मुलींना कोणतीही आर्थिक अडचण नसताना, मुदत ठेवींवर बँकेकडून तीन लाख 25 हजारांचे कर्ज मंजूर करुन घेत मुलींची फसवणूक केली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात रघुनाथ ताजनपुरे यांच्यासह संशयित सुरेश ताजनपुरे व बँकेचे तत्कालीन अधिकारी यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी पक्षाकडून अ‍ॅड. सुनीता चिताळकर यांनी युक्तिवाद करीत सहा साक्षीदार तपासले. साक्षीदारांची साक्ष व सबळ पुराव्यांच्या आधारे न्यायाधीश डी. डी. कर्वे यांनी रघुनाथ ताजनपुरे यांना दोषी धरत शिक्षा सुनावली, तर सुरेश ताजनपुरे व बँकेच्या अधिकार्‍यांची या गुन्ह्यातून पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली.

हेही वाचा :

Back to top button