तडका : भटकते आत्मे..! | पुढारी

तडका : भटकते आत्मे..!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच महाराष्ट्रातील एका वयोवृद्ध नेत्यासाठी भटकती आत्मा हा शब्द वापरला आहे. ज्याला मुक्ती मिळाली नाही किंवा काही इच्छा अतृप्त राहिल्या आहेत, असे आत्मे म्हणजे भटकते आत्मे होय. राजकारणामध्ये मोदींना हा शब्दप्रयोग देणार्‍या त्यांच्या थिंक टँकला नमन. इतके अद्भुत शब्द कुठून शोधले जातात आणि राजकीय नेत्यांना हे कोण पुरवत असते? हे काम थिंक टँक नावाचा पूरक समूह करत असतो. भटकते आत्मे समाजाच्या सर्व स्तरांमध्ये आढळून येतात आणि ते राजकारणामध्ये विशेषत्वाने ठळकपणे ओळखू येत असतात.

कालांतराने महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुका येतीलच. एक ना एक दिवस नगरसेवक होऊन दाखवतो, असे म्हणणारे असंख्य आत्मे प्रत्येक गावामध्ये असतात. प्रत्येक निवडणुकीच्या पूर्वी साधारणत: 6 महिने त्यांच्यामध्ये चैतन्य संचारते आणि ते कामाला लागतात. कोणा ना कोणा पक्षाकडून तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. तेही नाही मिळाले तर चक्क अपक्ष म्हणून असे आत्मे उभे राहतात. छत्री, कुलूप, पतंग, विटी-दांडू, टी.व्ही. किंवा जे कोणते चिन्ह मिळेल ते घेऊन साधारण महिनाभर हे मिरवत असतात. एकदाचे निवडणुकीमध्ये पराभूत झाले की, हे भटके आत्मे पुन्हा पाच वर्षांसाठी अद़ृश्य होतात. पुन्हा निवडणुका लागण्यापूर्वी आधी सहा महिने हे दिसायला लागतात.

असेच भटकते आत्मे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकींच्या दरम्यान सक्रिय झालेले असतात. ग्रामीण भागातील भटकते आत्मे पांढरेशुभ— खादीचे विजार-शर्ट आणि इस्त्रीची कडक टोपी डोक्यावर ठेवून सक्रिय झालेले असतात. पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद सर्कलमधील गावांना नियमित भेटी देणे, तेथील महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना ओल्या आणि सुक्या पार्ट्या देणे ही त्यांची प्राथमिक कार्ये असतात. लग्न समारंभामध्ये आवर्जून हजेरी लावणे यामध्ये हे भटकते आत्मे बिझी असतात. त्यांच्या राजकीय गुरूंनी त्यांना मरणाला आणि तोरणाला नेहमी हजर राहिले पाहिजे, असे शिकवलेले असते. सबब, समाजामध्ये काही घडत असले की, हे तिथे हजर असतात. कुणाच्या घरी सुनेचे डोहाळे जेवण असेल, तर हे स्वतः सहभागी न होता आपल्या पत्नीला तिथे पाठवून आपल्या प्रतिनिधीची नोंद करत असतात. सहसा भटकत्या आत्म्यांचा आणि विकासाचा काहीही संबंध नसतो. कुठे काही बरे चालले असेल, तर त्यांना आनंद होत नाही; त्यामुळे भटकते आत्मे हे भावा-भावामध्ये, बाप-लेकामध्ये, सासू-सुनेमध्ये सातत्याने भांडणे लावत असतात.

कुणाही पक्षाचे तिकीट न मिळालेले अनेक भटकते आत्मे सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये धुमाकूळ घालत आहेत. यात फक्त उमेदवार आहेत असे नाही, तर असंख्य कार्यकर्तेही या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून या पक्षात असा मुक्त संचार करत आहेत. निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर यातील बहुतांश भटकते आत्मे हे लटकते आत्मे झालेले पाहायला मिळतील. पुढील काळामध्ये अशाच प्रकारची परिस्थिती कायम राहिली तर खुनी हवेली, रक्ताळलेला खंजीर किंवा वह कौन थी? अशा प्रकारचे चित्रपट राजकारणामध्ये पाहायला मिळाल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.

Back to top button